मिरज: कोल्हापूर – पुणे इंटरसिटी तातडीने सुरू करा
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मिरज किंवा कोल्हापूर येथून गेल्या अनेक वर्षात एकही नवीन रेल्वे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे कोल्हापूर-पुणे इंटरसिटी तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून होऊ लागली आहे.
रेल्वेकडून पुण्यात रेल्वेची विविध विकासकामे करण्यात येत आहेत. पुण्यातून अनेक रेल्वेगाड्यांचा विस्तार करण्यात येत आहे. परंतु पुणे विभागांतर्गत येणार्या मिरज आणि कोल्हापूर स्थानकांचा मात्र पुणे विभागाकडून नेहमीच अपेक्षाभंग करण्यात आला आहे.
पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणामुळे रेल्वे फास्टट्रॅकवर येणार आहे. नवीन गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु कोल्हापूर, मिरज, सांगलीकरांना कामानिमित्त पुण्यात जाऊन एका दिवसात परत येणे कठीण होते.
त्यामुळे कोल्हापूर येथून तातडीने इंटरसिटी सुरू करावी, या गाडीला हातकणंगले, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा ठिकाणी थांबे द्यावेत, अशी मागणी होत आहे.
इंटरसिटी सुरू केल्यास प्रवाशांची सोय
मिरज आणि कोल्हापूर येथून सुटणार्या कोल्हापूर-मुंबई सह्याद्री, कोल्हापूर-हैद्राबाद, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस या पाच गाड्या बंद झाल्या आहेत.
त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गाड्या बंद करीत असताना या मार्गावर नव्या गाड्या सुरू करणे अपेक्षित होते. ते झाले नाही. परंतु आता कोल्हापूर-पुणे इंटरसिटी सुरू करावी, त्यामुळे कोल्हापूर, मिरज, सांगलीतील प्रवाशांची सोय होईल, असे मिरज रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील यांनी सांगितले.