कोल्हापूर उत्तर मतदारसंघात असा रंगणार सामना

(political news) कोल्हापूर उत्तरच्या (Kolhapur North) पोटनिवडणुकीतील (Byelection) जागेवर शिवसेना (Shivsena) व काँग्रेस (Congress) या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) दोन पक्षांत चुरस निर्माण झाली होती. मुंबईत काल (ता. १७) झालेल्या बैठकीत दोन्हीही पक्षांचे नेते आपापल्या भूमिकेवर ठाम होते, तथापि आज सायंकाळी ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

कोल्हापूर उत्तरमधून २०१९ मध्ये काँग्रेसचे (कै.) चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. या जोरावर ही जागा काँग्रेसलाच द्यावी, असा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आग्रह आहे. दुसरीकडे पाच वेळा ही जागा जिंकल्याने या जागेवर शिवसेनेचाच हक्क असल्याची भूमिका सेना नेत्यांची आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. १६) दोन्ही पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक मुंबईत ठेवण्यात आली होती; पण त्या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित नसल्याने निर्णय झाला नाही. काल (ता. १७) पुन्हा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला शिवसेनेचे मंत्री उदय समंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, श्री. मुश्रीफ, पालकमंत्री पाटील आदी उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या जागेवर सेनेचाच हक्क आहे. या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार पाच वेळा विजयी झाला आहे. आता जागा सोडली तर पुन्हा २०२४ मध्येही काँग्रेसच यावर दावा करेल, त्यातून शिवसेनाच शहरातून नाहीशी होईल. म्हणून ही जागा सेनेला सोडावी, अशी भूमिका देवणे यांनी मांडली. त्याला पालकमंत्री पाटील यांनी विरोध केला. २०१९ मध्ये काँग्रेसचा उमेदवार येथून विजयी झाल्याने या जागेवर काँग्रेसचाच हक्क आहे. ज्या मतदारसंघात अशी परिस्थिती येते, तेथे ज्या पक्षाचा आमदार असतो, त्या पक्षालाच ही जागा दिली जाते, असा दावा श्री. पाटील यांनी करून जागा काँग्रेसलाच द्यावी, असा आग्रह धरला. दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या मतांवर ठाम राहिल्याने हा प्रश्‍न शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेण्याचे ठरले.

बैठकीला उपस्थिती मंत्री उदय सामंत व दुधवडकर यांच्यावर श्री. ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे अधिकार देण्यात आले. आज दुपारी या दोघांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन वृत्तांत सांगितला. त्यानंतर सायंकाळी श्री. ठाकरे यांनी उत्तरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय जाहीर केला. (political news)

मैत्रीपूर्ण लढतीलाही विरोध

मुंबईतील बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत करावी, असा प्रस्ताव सेनेच्या नेत्यांनी ठेवला; पण त्यालाही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. आता भाजप-काँग्रेस लढतीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, याचा फायदा कोणाला होणार, हे निकालातून स्पष्ट होईल.

शिवसेनेचा बालेकिल्ला

या मतदारसंघातून १९९०, १९९५, १९९९, २००९ व २०१४ अशा पाच वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असावा, यासाठी सेना नेत्यांचे प्रयत्न सुरू होते, पण मुख्यमंत्री ठाकरे यांनीच ही जागा काँग्रेसला सोडल्याने भविष्यातील शिवसेनेच्या अस्तित्त्वावर प्रश्‍नचिन्ह उभे राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *