कोल्हापूरात आज सर्वसाधारण सभेचे आयोजन
विद्यमान सभागृहाचा कार्यकाल पुर्णत्वाच्या उंबरठ्यावर शुक्रवारी (ता.१७) कोल्हापूर जिल्हा परिषदेची (kolhapur zp) सर्वसाधारण सभा होत आहे. यानंतर सभा होणार किंवा नाही, याबाबत मोठी अनिश्चितता आहे. त्यामुळे या सभेत विविध विषयांचा व त्यातही विकास कामांच्या मंजुरीचा पाउस पडणार आहे.
सभागृहाचा कार्यकाल संपत आल्याने वादविवाद आणि मानापमान न करता ही सभा घेण्याचा अधिकारी,पदाधिकारी यांचा मानस आहे. मात्र त्याला सदस्य कितपत दाद देतात, यावरच सभेचे कामकाज अवलंबून असणार आहे.
जिल्हा परिषदेची सभा तीन महिन्यांनी होत आहे. यापुर्वी सभा घेण्याचे निश्चित झाले होते मात्र अचानकच विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि सभा रदद करण्यात आली. त्यामुळे सभा घेण्यास विलंब झाला आहे. या सभेमध्ये विविध विषयांना मंजुरी दिली जाणार आहे.
यामध्येही विकास कामांचा भरणा मोठा आहे. १५ वित्त आयोग, विविध योजनांना तरतूद व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रथम सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी दिली जाणार आहे. सभेची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरु आहे. यावेळी सदस्यांसाठी अध्यक्ष राहूल पाटील यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.
काही अधिकारी फोन उचलत नाहीत, पत्रांना उत्तर देत नाहीत, निधी मंजूर करताना होत असलेला भेदभाव, असमान निधी वाटप आदी मुद्यावर सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेने उत्पन्न वाढीसाठी टेंडर फीमध्ये केलेली भरमसाठ वाढ या विषयावर चर्चा होणार असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले.