सत्तारूढचं ठरलं..! औपचारिकता बाकी; शिरोळचा तिढा सुटला

(political news) जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीयांना समाविष्ठ करण्याच्या दृष्टीने सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलचा प्राथमिक आराखडा रविवारी रात्री तयार झाला. या पार्श्‍वभूमीवर आ. पी. एन. पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची बैठक झाली. तिघांनी आ. विनय कोरे यांच्याशी फोनवरून संपर्क केला. तासभर झालेल्या या चर्चेत शिवसेना पदाधिकार्‍यांशी सोमवारी (दि.20) चर्चा करून त्यानंतर दुपारी पॅनेलची घोषणा करण्याचे ठरले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 12 तालुक्यांतील संस्था गटातील निवडणूक प्रत्येकाने ताकदीवर लढवावी. ताकद नसेल तर सत्तारूढ आघाडीच्या उमेदवाराला पाठबळ द्यावे, असे ठरले होते. त्यानुसार गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध झाले.

शिवसेना, भाजप आघाडी, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, आदींनी सत्ताधार्‍यांसोबत येण्याचे मान्य केले. मात्र, उर्वरित गटातील नऊ जागांवर या सर्वांना समावून घेताना सत्ताधारी नेत्यांना कसरत करावी लागत आहे. पॅनेलची रचना निश्‍चित करण्यासाठी गेल्या चार दिवसांत बैठकांच्या अयशस्वी फेर्‍या झाल्या. आ. कोरे यांचे समाधान होईपर्यंत शिवसेना आणखी दोन जागांवर अडून बसली. त्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलची घोषणा लांबणीवर पडत गेली.

या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील, ना. हसन मुश्रीफ आणि आ. पी. एन. पाटील यांच्यात सुमारे तासभर बैठक झाली. पॅनेल करताना किती मागे यायचे? शिवसेनेला किती जागा द्यायच्या? आ. कोरे यांच्या समर्थकांना कोणत्या गटातून उमेदवारी द्यायची? याबाबत तिघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. तिघा नेत्यांनी पॅनेलचा कच्चा मसुदा तयार केला. यानंतर आ. कोरे यांच्याशी फोनवरून संपर्क केला. आता सोमवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी पालकमंत्री सतेज पाटील आणि ना. हसन मुश्रीफ हे दोघे चर्चा करणार आहेत. यानंतर दुपारी पॅनेलची घोषणा केली जाणार आहे.(political news)

शिरोळचा तिढा सुटला

शिरोळ तालुका संस्था गटातून ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील या दोघांपैकी एकाने माघार घ्यावी. जो माघार घेईल त्यास स्वीकृत संचालक करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, दोघेही लढण्यावर ठाम असल्याने पेच कायम होता. आता शिरोळचा तिढा सुटला आहे. एकजण माघार घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजू शेट्टी यांनी गणपतराव पाटील यांना पाठिंबा देण्यासाठीच या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चर्चेनंतर राजू शेट्टी यांच्याही अर्जाची माघार होणार असल्याने शिरोळ संस्था गटातील निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत आहेत.

जिल्हा बँकेत सर्वांनाच सोबत घेतले पाहिजे

जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुसूत्रीपणा असला पाहिजे. तोट्यात असणारी बँक सध्या सुस्थितीत आहे. त्यामध्ये काही डिस्टर्ब होऊ नये, या मताचा मी आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे पाहताना सर्वांना सोबत घेऊनच जाणे योग्य आहे. हे आपले वैयक्‍तिक मत असल्याचे शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांनी रविवारी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर सोमवारी कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. दुपारी एक वाजता त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल करण्याची घोषणा केल्यानंतर आज शिवसेना पदाधिकारी व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे काही झाले नसल्याचे समजते. यासंदर्भात खा. मंडलिक यांच्याशी रात्री उशिरा संपर्क साधला असता ते म्हणाले, आज मी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बाहेर असल्याने अन्य नेत्यांशी आपली काही चर्चा होऊ शकली नाही. सोमवारी संपर्कप्रमुख दुधवडकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत पॅनेलबाबत चर्चा होईल.

परंतु, जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. कारण, जिल्हा बँकेचा मी संचालक झालो तेव्हा शिवसेनेतच होतो. आतादेखील शिवसेनेत आहे. जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेली ही बँक तोट्यात होती. त्यावेळी बँकेकडे पाहण्यास कोणी तयार नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. बँक सुस्थितीत आहे. ठेवीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक निर्णय गेल्या पाच वर्षांत आम्ही घेतले आहेत. अशा परिस्थितीत बँकेत एकसूत्रीपणा येऊ नये याकरिता सर्वांना सोबत घेऊनच या निवडणुकीतदेखील जाणे आवश्यक आहे. असे आपले वैयक्‍तिक मत आहे, असे खा. मंडलिक म्हणाले.

स्वतंत्र पॅनेल करण्याची आम्ही घोषणा केली. त्याला संपूर्ण जिल्ह्यातून चांगला प्रतिसाददेखील मिळाला. अनेकांनी पाठिंबा देण्याची भूमिका दर्शविली, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *