सात लाख कर्मचारी संपात सहभागी, बँकेची सर्व कामे ठप्प; ग्राहकांचे हाल

राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बँकांचे खासगीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आज आणि उद्या असा दोन दिवस संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये युनाइटेड फोरम ऑफ बँक्स युनियन (UFBU), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (AIBOC), इंडिया बँक एप्लॉईज असोशियशन (AIBEA) या तीन प्रमुख संघटनांसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. तब्बल सात लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.

कामकाजावर परिणाम

कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे दैनदीन बँकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. चेक स्वीकारणे, चेक  विड्रॉल करणे, लोन मंजुरी, लोन जमा करणे अशा सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्य ग्राहक अडचणीमध्ये सापडले आहेत. दरम्यान  बँक कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार बँकेंचे कामकाज बंद आहे. शनिवारी देखील देशातील अनेक बँकांना सुटी आहे. तर रविवारी विकेंड असल्यामुळे बँकांना सुटी राहिल.  आजपासून सलग चार दिवस बँका बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्य़ता आहे.

सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा तीव्र विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल. ग्रामीण भागातील कर्ज वितरणावर थेट परिणाम होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. तसेच बँकांचे खासगीकरण झाल्यास ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींच्या जोखमीमध्ये देखील वाढ होईल, असे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आजापासून दोन दिवसीय संप पुकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *