आणखी एका शाळेत करोनाचा स्फोट

देशात करोना विषाणूची दहशत कायम असून पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे एकाच शाळेतील २९ विद्यार्थ्यांना करोना संसर्गाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना (student) होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले असून त्यांना घरीच उपचार देण्यात येत आहेत.

एकीकडे ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत असताना कोविड बाधित रुग्णांची संख्याही गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. त्यातच देशातील काही भागांत शालेय विद्यार्थी करोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रात नवी मुंबईत गेल्याच आठवड्यात एका शाळेत १८ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये एकाच शाळेत २९ करोना बाधित विद्यार्थी आढळल्याने शाळा सुरू ठेवण्याचा आग्रह विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालय या वस्तीशाळेत २९ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. सर्व विद्यार्थी नवव्या आणि दहाव्या इयत्तेतील आहेत. मुलांना कफ आणि सर्दीचा त्रास असून तीव्र लक्षणे नसल्याने होम क्वारंटाइन राहून उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याबाबत पालकांना कळवण्यात आले असून विद्यार्थ्यांना घरी नेण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली.

दरम्यान, शाळेतील सर्वच विद्यार्थी (student) आणि शिक्षकांच्याही कोविड चाचण्या करण्यात येत असून त्याचे अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलण्यात येतील, असे कल्याणी येथील उपविभागीय अधिकारी हिरक मंडल यांनी सांगितले.

नवी मुंबईतील शाळेत १८ बाधित

नवी मुंबईतील घणसोली येथील शाळेत गेल्या आठवड्यात १८ मुलांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. एका विद्यार्थ्याचे वडील कतार येथून परतले होते. त्याच्या घरातील सर्वांची करोना चाचणी करण्यात आली असता विद्यार्थ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. दरम्यान, तो शाळेत नियमित जात असल्याने त्याच्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्यात आली. त्यात आणखी १७ विद्यार्थी करोना बाधित आढळले. या सर्व मुलांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. शाळेतील साडेनऊशेच्या वर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. ही शाळा तूर्त बंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *