नितेश राणेंना अटक होणार?
(political news) सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा सुरु झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली. पण तिसऱ्यांदा चौकशीला ते हजर राहिले नाहीत. त्यानंतर पोलीस नितेश राणे यांच्या घरी गेले होते. पण तेथे ते दिसले नाहीत. यामुळे नितेश राणेंना अटक होणार की काय अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
”सुडाच्या राजकारणातून हे चालले. नितेश अज्ञातवासात नाही. नितेश राणे याच्या बाबतीत सरकारला जे करायचे आहे ते करु देत. त्याने कोणतीही हरकत केलेली नाही.” असा इशारा नारायण राणे यांनी दिलाय. नारायण राणे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सिंधुदुर्गमधील घडामोडींवर भाष्य केले.
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवन परिसरात येताच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसलेले आमदार नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’ असा आवाज काढून आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, कधीकाळी शिवसेना वाघाप्रमाणे डरकाळ्या फोडत होती. मात्र हल्ली सेनेची अवस्था मांजरासारखी झाली आहे. म्हणूनच आपण आदित्य ठाकरेंना बघून म्याव म्याव असा आवाज काढला होता. (political news)
नितेश राणेंच्या म्याव म्याव प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेतेही नितेश राणेंच्या ‘म्याव म्याव’ प्रकरणाचा समाचार घेत आहेत. दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक मीम ट्विट करून राणेंवर ‘पहचान कौन’ असे म्हणत अप्रत्यक्ष टीका केली होती. या मीममध्ये कोंबडीच्या तोंडावर मांजराचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे.