१ जानेवारीपासून तुमच्या खिशाला बसणार फटका;

नवं वर्ष २०२२ सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुकतेने वाट पाहात आहे. काही जणांनी नवे संकल्प पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक आखलं आहे. तर दुसरीकडे २०२२ वर्षात काही बदल होणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. त्यामुळे तुमचा संकल्प जर त्या गोष्टींशी निगडीत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एटीएममधून पैसे काढणे, कपडे-चप्पल बूट खरेदी करणे या सारख्या गोष्टी महाग होणार आहेत. १ जानेवारी २०२२ पासून ६ गोष्टीत बदल होणार आहे, जाणून घेऊयात
आरबीआयने एटीएममधून मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खातेधारकांना १ जानेवारीपासून एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर ०.५०% शुल्क भरावे लागेल, जे किमान रु.२५ असेल. तथापि, बेसिक सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. बेसिक सेव्हिंग अकाउंटव्यतिरिक्त दुसऱ्या सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये १० हजार रुपयांपर्यंतची रक्कमेसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १० हजारांच्या वर ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल. प्रति व्यवहार किमान २५ रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये दरमहा रु २५ हजारापर्यंत रोख काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ०.५०% शुल्क आकारले जाईल.१ जानेवारीपासून कपडे आणि फुटवेअरवर १२% जीएसटी लागू होणार आहे. भारत सरकारने कापड, रेडिमेड आणि फुटवेअरवरील जीएसटी ७ टक्क्याने वाढवला आहे. याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिक्षा बुकिंगवर ५% जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच ओला, उबेर यांसारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटो रिक्षा बुक करणे आता महाग होणार आहे. मात्र, ऑफलाइन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. तो कराच्या बाहेर ठेवण्यात आला आहे.
नवीन वर्षात, मारुती सुझुकी, रेनॉल्ट, होंडा, टोयोटा आणि स्कोडा यासह जवळपास सर्वच कार कंपन्यांच्या कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल. टाटा मोटर्स १ जानेवारी २०२२ पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५ टक्क्याने वाढवणार आहे.
अ‍ॅमेझॉनच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता प्राइम व्हिडिओवर लाइव्ह क्रिकेट सामने पाहता येणार आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ १ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसह क्रिकेट स्ट्रीमिंग प्लेमध्ये प्रवेश करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *