“शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला गंडवलं”

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला. दरम्यान ज्येष्ठ मंत्र्यांनी भेट घेऊनही निवडणूक प्रक्रियेस परवानगी देण्यास राज्यपालांनी आक्षेप घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना खरमरीत भाषेत पत्र पाठवलं होतं. दरम्यान या पत्रातील सूर असंयमी व धमकावणारा असल्याचे नमूद करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक नियमातील बदल प्रथमदर्शनी घटनाबाह्य व बेकायदेशीर वाटल्याने त्याअंतर्गत निवडणूक प्रक्रिया राबविण्यास संमती देण्यासाठी माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही, असं राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काय खेळी खेळली आहे. वास्तवात त्यांना काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष व्हावेत असं वाटतच नव्हतं. त्यांच्याकडे १७० आमदार आहेत तर भाजपाकडे १०५ आमदार आहेत. गुप्त मतदान केलं असतं तरी अध्यक्ष झाला असता. पण राज्यपालांच्या नावे त्यांनी निवडणूक होऊ दिली नाही. ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची खेळी होती,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
“राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांकडून धमकी दिली जाते. ६ वाजेपर्यंत उत्तर द्या नाहीतर विधानसभेचा अवमान झाल्याचा प्रस्ताव आणू. हे सगळं कशासाठी तर काँग्रेसचा तसंच पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष होऊ नयेत म्हणून…ठाकरे आणि पवारांनी काँग्रेसला गंडवलं,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. “हे उद्धव ठाकरे सरकार उद्धट सरकार असून राज्यपाल आणि संविधानाचा अपमान करत आहे. महाराष्ट्राची जनता हे मान्य करणार नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.
“अनिल देशमुखांची दोन्ही मुलं आता आरोपी ठरली आहेत. त्यांचे सीए, वकीलही आरोपी आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीसमोर आत्मसमर्पण करावं लागणार आहे. अन्यथा त्यांच्या नावाचा वॉरंट निघेल आणि फरार म्हणून घोषित केलं जाणार. ही चार्जशीट अंतिम नाही, चौकशी सुरु आहे. चौकशीच्या तिसऱ्या टप्प्यात अनिल देशमुखांनाही हिशोब द्यावा लागणार. तिसऱ्या चार्जशीटमध्ये आणखी काही लाभार्थींना घोषित केलं जाऊ शकतं,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

“मुलांना कोर्टात जाऊन जामीनासाठी अर्ज करावा लागणार आहे. कोर्ट जामीन देतं का नाही ते पहावं लागेल, पण बाप आणि दोन बेटे तिघेजण मनी लाँड्रिंगमध्ये आरोपी ठरले आहेत,” असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *