सांगलीत बर्निंग कारचा थरार

सांगली येथील स्टेशन चौकात बर्निंग कारचा ( Burning car ) थरार पाहण्यास मिळाला. पार्किंग मध्ये थांबलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. त्यानंतर पेटलेली कार आपोआप विनाचालक रस्तावर धावू लागली. ही गाडी रस्त्याच्या कडेला असणार्‍या आयलँडला जाऊन धडकल्याने मोठी दुर्घटना टळली. याच वेळी दाखल झालेल्या अग्निशमन पथकाने आग शमवली. मात्र चालका शिवाय गाडी धावल्याच्या प्रकाराने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत अग्नीशमन विभागाचे प्रमुख विजय पवार यांनी सांगितले की, स्टेशन चौकात कार पार्किंग मध्ये उभी होती. रविवारी (दि. २) रात्रीच्या सुमारास कडक्याच्या थंडीत या गाडीला आग लागली. ही आग लागल्याची बाब आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती तात्काळ अग्निशमन दलाच्या पथकाला दिली. पथक पाण्याचा बंब घेऊन दाखल झाले. पाण्याचा फवारा मारायला सुरुवात करताच पेटलेली गाडी रस्त्यावर धावू लागली.

सुमारे १०० फूट अंतर गाडीने विना चालक पार करत रस्त्याच्या पलीकडे असणार्‍या आयलँडला जाऊन धडक दिली. सुरुवातीला आसपासच्या नागरिकांना गाडी कोण तर चालवत आहे, असं वाटलं. पण अग्निशमन पथकाने आग शमवून गाडीचा दरवाजा उघडून पाहिले असता गाडीत कोणीच नव्हते. त्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाले होते. मात्र तातडीने अग्निशमन दलाने आग शमवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *