KDC निवडणूक :चुरशीने मतदान,शिरोळमध्ये वादावादी, हुज्जत, हमरीतुमरीने तणाव
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( Kolhapur District Bank Election ) निमित्ताने गावागावांतील राजकारण ढवळून निघाले. संस्था गटातील सहा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असल्या तरी ठरावधारकांना इतर गटातील पाच मतांचा अधिकार असल्याने तालुक्यातील ईर्ष्येचे वातावरण कायम असल्याचे बुधवारी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील 13 ठिकाणी 40 केंद्रांवर 7,651 पैकी तब्बल 7,498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात 100 टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात 448 पैकी 446, पतसंस्था गटात 1221 पैकी 1207, इतर संस्था गटात 4115 पैकी 3995 असे सरासरी 98 टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेला मताचा टक्का (Kolhapur District Bank) Electionकोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्कंठा राजकीय वर्तुळात आहे. 15 जागांसाठी 33 उमेदवारांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी मतमोजणी दिवशी स्पष्ट होणार आहे.
शिरोळमध्ये वादावादी, हुज्जत, हमरीतुमरीने तणाव
शाब्दिक वादावादी, दोन गटांत हुज्जत, हमरीतुमरी, नेत्यांच्या नावाचा जयघोष, हुल्लडबाजी, फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात मतदान झाले. येथील पद्माराजे विद्यालयात मतदान प्रक्रियेला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. सहकारी सेवा संस्था, नागरी बँका व पतसंस्था, पाणीपुरवठा कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया संस्था आणि इतर अशा चार गटांच्या संचालक पदासाठी बुधवारी चढाओढीने व चुरशीने मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत चार गटांत 98 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली, तर सेवा संस्था गटात 100 टक्के मतदान झाले.
सकाळच्या पहिल्या टप्प्यात दत्त साखरचे चेअरमन, उमेदवार गणपतराव पाटील, संजय पाटील-यड्रावकर, माजी खा. निवेदिता माने, माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. उल्हास पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, दिलीपराव पाटील तर दुसर्या टप्प्यात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वरूपाताई यड्रावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
तुमचा काय संबंध?
राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस चंगेजखान पठाण यांनी मतदान केंद्रावर जाऊन बनावट मतपत्रिका असून तपासणी करावी, अशी मागणी करताच संजय पाटील-यड्रावकर यांनी आपण मतदार आहात का, आपले मतदान आहे का, तुमचा काय संबंध आहे, असे खडसावत पठाण यांना मतदार केंद्राबाहेर काढून पोलिसांकडे तक्रार केली.