कोल्हापूर जिल्हा बँकेची सत्ता सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी राखली, पण…
(political news) प्रचारात आरोप प्रत्यारोप करत शिवसेनेने घाम फोडला, पण कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या मात्र सत्ताधारी आघाडीकडे कायम राहिल्या. तब्बल १७ जागा जिंकत जिल्ह्यावर आपलाच वरचष्मा असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) व गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सिद्ध केले. या निवडणुकीत विरोधी पॅनेल म्हणून मैदानात उतरलेल्या शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. आमदार प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, अप्पी पाटील यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
कोल्हापूऱ जिल्हा बँकेवर गेले अनेक वर्षे दोन्ही काँग्रेसचीच सत्ता होती. शिवसेनेला सोबत घेत निवडणूक बिनविरोध करत सत्ता कायम ठेवण्याचे प्रयत्न सत्ताधारी आघाडीकडून झाले. पण केवळ दोन जागा देण्याची भूमिका मान्य न झाल्याने शिवसेनेने रिपाइं व शेकापला सोबत घेऊन पॅनेल केले. तीन जागांची मागणी मान्य न झाल्याने तेवढ्या जागा लढून जिंकल्या असल्या तरी त्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागले. शिवसेना बाहेर पडल्याने दोन्ही काँग्रेसने चक्क भाजप आणि जनसुराज्यला सोबत घेतले. यामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती. निकालानंतर मात्र ही निवडणूक सत्ताधारी आघाडीने एकतर्फी जिंकल्याचे स्पष्ट झाले. तरीही सेनेने तीन जागा मिळवत जोरदार एन्ट्री केल्याचे दिसले. रणवीर गायकवाड हे एकमेव स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. ते सत्ताधारी आघाडीबरोबर जाणार की विरोधात बसणार याबाबत त्यांनी अजून आपली भूमिका जाहीर केली नाही.
बँकेत संचालक म्ह्णून ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, गृहराज्यमंत्री पाटील, आमदार पी.एन. पाटील, राजेश पाटील, ए.वाय. पाटील, माजी आमदार अमल महाडिक हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १५ जागासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. त्यामध्ये शिवसेनेने तीन जागा मिळवल्या. त्यामध्ये खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आणि प्रा. अर्जुन आबिटकर यांचा समावेश आहे. पाटील आणि आबिटकर यांना सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलमध्ये न घेतल्याने निवडणूक लागली आणि विरोधात जाऊन हे दोघेही निवडून आले. (political news)
या निवडणुकीत पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. याशिवाय बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिष्ठित केलेले गणपतराव पाटील यांचाही पराभव झाला. सत्ताधारी आघाडीच्या वतीने माजी खासदार निवेदिता माने,आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार विनय कोरे, रणजीत पाटील, संतोष पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, राजू आवळे, स्मिता गवळी, प्रताप माने, श्रुतिका काटकर हे विजयी झाले.
सत्ताधारी गटाच्या वतीने निवडून आलेले माजी खासदार माने व राज्यमंत्री यड्रावकर हे शिवसेनेचे आहेत. यामुळे पक्ष म्हणून सेनेला चार जागा मिळाल्या. विरोधी गटातर्फे निवडून आलेले बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. यामुळे बँकेत यानंतर पक्षीय राजकारण होणार की गटातटाचे याचीच उत्सुकता आहे.