KDC निवडणूक : मतपेटीत सापडली ५० रुपयांची नोट
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या(KDCC) निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवार सकाळी (दि.०७) ८ वाजल्यापासून सुरूवात झाली. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी होत आहे. दरम्यान, जिल्हा बँकेचा पहिल्या टप्प्यातील कौल सकाळी दहा वाजता समजणार आहे. बँकेच्या निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
महिनाभर जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणार्या जिल्हा बँक संचालकांच्या २१ जागांपैकी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी आ. अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची निवड बिनविरोध झाली. संस्था गटातील सहा जागांसह १५ जागांसाठी ३३ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी झालेल्या मतदानानंतर मतपेटीत बंद झाले.
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला आज शुक्रवारी (दि.७) सुरुवात झाली. (KDCC)मतपेट्या उघडताच त्यात मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. ‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा…आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी (KDCC) असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.
‘उद्यापासून समरजितदादा सर्वसामान्य लोकांची (KDCC) डोकी फोडण्यासाठी तालुका फिरायला मोकळे’, असे एका चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. तर चक्क एका मतदाराने मतपेटीत टाकलेले पन्नास रुपये मतमोजणीवेळी सापडले. हा विषय मतदान केंद्रावर खूप चर्चेचा ठरला आहे.