दुचाकीचा पाठलाग करत बिबट्याचा तरुणावर हल्‍ला

चांडोली-लौकी रस्त्यावरून दुचाकीने घरी जात असताना (शुक्रवार) रात्री दुचाकीस्‍वाराचा बिबट्याने पाठलाग करत दुचाकीवर मागे बसलेला युवक जखमी झाला. पप्पू उर्फ प्रतीक थिटे (वय २९, रा. लौकी, ता. आंबेगाव) असे जखमीचे नाव आहे.

या घटनेबाबत पप्पू उर्फ प्रतीक थिटे याने सांगितले की, चांडोली मार्गे आम्‍ही दुचाकीवरुन घरी जात होतो. या वेळी बिबट्याने अचानक दुचाकीचा पाठलाग सुरु केला. निलेश दुचाकी चालवत होता तर मी मागे बसलो होतो. निलेश भरधाव वेगाने गाडी चालवत असतानाच त्याने सांगितले की, आपल्या मागे बिबट्या लागला आहे. बिबट्याने आमच्यावर झडप घातली. य बिबट्याचा पंजा व दात माझ्या पायावर लागले. आम्‍ही हिंमत न हारता घर गाठले. माझ्या पायाला दुखापत झाली आहे.पप्पू उर्फ प्रतीक थिटे याच्‍यावर जिल्हा उपरुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत.दरम्यान ही माहिती माजी सरपंच संदेश थोरात यांना समजली. त्यानंतर वनपाल नारायण आरोडे व वनमजूर कोंडीभाऊ डोके यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेची वनविभागाने चौकशी केली. खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैशाची मदत करा, अशी विनंती या हल्ल्यात जखमी झालेला प्रतीक थिटे याने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *