सांगली : झुलत्या पुलामुळे पर्यटनाला चालना, औदुंबर ते भुवनेश्वरीदरम्यान होणार पूल

श्री दत्त देवालय औदुंबर व भुवनेश्वरी देवी ही दोन प्रसिद्ध तीर्थस्थळे झुलत्या पुलाने जोडली जाणार आहेत. महाराष्ट्रातील हा पहिला झुलता पूल भक्ती व शक्तीचा संगम करणारा पर्यटनाचा आकर्षण बिंदू ठरेल.

गुरुवारी श्री दत्त देवस्थानाचे दर्शन घेणारे भक्त कृष्णा नदीत नौका विहाराचा आनंद घेत भुवनेश्वरी देवीच्या दर्शनास जातात. वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. दोन्ही तीर्थक्षेत्रे जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात. या देवस्थानांच्या दरम्यान कृष्णा नदीवर दोनशे मीटर लांबीचा झुलता पूल होत आहे.कर्नाटकातील झुलत्या पुलांच्या धर्तीवर या पुलाची रचना असणार आहे. महापुराची 2019 ची पाणीपातळी लक्षात घेऊन या पुलाची उंची ठेवण्यात येणार आहे.प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत 327.60 लक्ष रुपये खर्च करून होणारा हा झुलता पूल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा, अशी रचना असणार आहे. पुलावरून खाली पाहिले असता कृष्णा नदीचे मनोहारी रूप हृदयाचा ठाव घेणारे ठरावे, याकरिता काचांचा वापर केला जाणार आहे. रात्रीच्यावेळी झुलत्या पुलाचे रूप अधिक खुलून दिसावे, यासाठी एलईडीने सजावट करण्याचे नियोजन आहे. 2018-2019 मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या झुलत्या पुलाच्या कामाचा प्रारंभ झाला आहे.

दोन मीटर रूंदी व दोनशे मीटर लांबीच्या या झुलत्या पुलासाठी दोन्ही काठावर दोन मनोरे उभारले जाणार आहेत. मेन केबल, हँगिंग केबल व फायबर ग्लासच्या वापराने पुलाची उभारणी केली जाईल.झुलत्या पुलावरून कृष्णेचे संथ वाहणारे पाणी व नदीची वेडीवाकडी वळणे पाहणे मनोहारी ठरेल. सोबतच कृष्णा नदीपात्रात बोटिंगची सुविधाही कालांतराने सुरू होणार आहे. औदुंबर येथे पर्यटकांच्या सोयीकरिता बहुमजली वाहनतळ उभारण्यात येत आहे. यासाठी 226.04 लक्ष निधी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. पार्किंगची सोय करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *