तुरुंगातील आरोपी निघाला पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून तुरुंगात असलेल्या आरोपीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन पोलीस ठाण्यातील हा सर्व प्रकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात ३०७ च्या प्रकरणात ७ ते ८ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयान कोठडी मिळाल्याने कारागृहात पाठवण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी यातील एका आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. मात्र सोबतच्या इतर आरोपींचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना कारागृहात पाठवण्यात आले आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या आरोपीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.विशेष म्हणजे या घटनेनंतर पोलिसांची चिंता वाढली आहे. कारण पॉझिटिव्ह आलेला रुग्ण न्यायालयात नेताना आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेताना दहा ते बारा पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले होता. त्यामुळे आता संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी केली असून, रिपोर्ट काय येतो याची चिंता त्यांना लागली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील बुधवारी रुग्ण संख्येचा आकडा धडकी भरवणारा आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल ४८४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. औरंगाबाद माहिती कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी एकूण ४८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात मनपा हद्दीत ४१० रुग्णांचा समावेश असून, ग्रामीण भागातील ७४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण ७१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून १८३९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.