खासगी रुग्णालयांना तंबी! संशयित करोना रुग्णांवर परस्पर उपचार कराल तर…

करोनाचा (Coronavirus) संसर्ग झपाट्याने वाढत असताना अनेक नागरिक चाचणी करून घेत नाही तसेच परस्पर उपचार घेतात. त्यामुळे प्रशाससनाला नेमकी माहिती मिळत नाही आणि काळजी न घेतल्याने हे रुग्ण सुपरस्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शंकर गोरे (Shankar Gore) यांनी खासगी रुग्णालयांना तंबी दिली आहे. महापालिका आरोग्य यंत्रणेला माहिती न देता संशयित करोना रुग्णांवर परस्पर उपचार केल्यास, लक्षणे असतानाही रुग्णांना चाचणी न करण्याचा सल्ला दिल्ल्यास संबंधित खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आढळून येत असल्याने अनेक रुग्ण महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चाचणी करण्याऐवजी खासगी डॉक्टरांकडून औषधे घेऊन उपचार करीत आहेत. परंतु यातील संभाव्य करोना रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य व शेजारील नागरिक यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना करोनाची लागण होण्याची भीती आहे, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले.या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. करोना बाधित रुग्णांवर कोणते उपचार करावेत, अशा रुग्णांसाठी कार्यपद्धती काय असावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. करोना संदर्भातील चाचणी केल्यानंतर संबंधित रुग्णांची माहिती महापालिकेस उपलब्ध होऊ शकणार आहे. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले की, खासगी डॉक्टरांनी करोना चाचणी टाळून, लक्षणे असलेल्या एखाद्या रुग्णावर उपचार केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
पूर्वी करोना रुग्णांसंबंधी नियम कडक होते. औषध दुकानातून परस्पर औषधे मिळत नव्हती. खासगी रुग्णालयात आलेल्या संशयित रुग्णांना लगेच चाचणी करून घेण्यासाठी पाठविण्यात येत होते. आता मात्र हे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे नागरिक लक्षणे असूनही परस्पर उपचार घेण्यावर भर देत आहेत. आता महापालिकेने याची दखल घेऊन पुन्हा यासंबंधी सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *