खतांच्या किमती वाढण्याची शक्यता

चाकण, ता, १५ : रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खताच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच खतांची टंचाई असून आहे. १०:२६:२६ हे खत सध्या बाजारात उपलब्ध नाही. पोटॅश खतांच्या एका पोत्यामागे ७०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पोटॅशच्या खताच्या किमती वाढल्या तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच इतर खताच्या किमतीत दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या पोटॅश खताची एक पिशवी जुन्या दराने म्हणजेच ९७५ रुपयाला विकली जात असल्याचे खत विक्रेत्यांनी सांगितले.
इतर खतांच्या दरात शंभर, दोनशे, तीनशे रुपयांची वाढ झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे, पण सध्या जुन्या दराने खते विकली जात आहेत. रासायनिक खतांच्या किमती वाढल्या तर शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. रासायनिक खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पोटॅश खताच्या किमती वाढल्या तर इतर खतांच्या किमती १०० ते ३०० रुपयांनी वाढल्या आहेत. युरिया व डीएपी ही दोन खते सरकारने राखीव ठेवल्याने त्यांचे जुने दर मात्र कायम आहेत. युरिया एक पिशवी २६६ रुपये व डीएपी एक पिशवी १२०० रुपयाला विकली जात आहे. इतर खते १५:१५:१५ एक पिशवी जुन्या दराने ११८० रुपयाला मिळत होती नव्या दराने १४०० रुपयाला मिळत आहे. महाधन २४:२४:० जुन्या दराने १३५० रुपयाला एक पिशवी मिळत होती ती सध्या १७०० रुपयाला विकली जात आहे. राष्ट्रीय पातळीवर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असल्याने तसेच खते बनविणाऱ्या कंपन्यांना काही रासायनिक कच्चा माल परदेशातून आयात करावा लागतो. त्या खर्चात वाढ होत असल्याने कंपन्या खतांच्या किमती वाढवत आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होत आहे. यावर सरकारने नियंत्रण ठेवावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. खतांच्या किमती वाढीचा फटका कांदा, बटाटा, ऊस, भाजीपाला, फळभाज्या उत्पादकांना बसणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाची साथ, काही भागात दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्याची अवस्था खूप बिकट झाली आहे. यापुढे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली तर शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे.खतांच्या किमती वाढल्या असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा, बटाटा, ऊस व इतर पिकांचा उत्पादन खर्च त्यामुळे वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी काय करायचे. सरकारने खतांच्या किमती कमी केल्या पाहिजे.
गजानन गाडेकर, अध्यक्ष, शेतकरी बचाव आंदोलन संघटनाबदलत्या हवामानात खतांची अधिक गरज भासत आहे. त्यातच खताच्या किमती वाढत असल्याने शेतकरी पीक घेऊनही तोट्यात येणार आहेत.
हनुमंत गाडे, कांदा उत्पादक