ऐन हंगामात सांगली जिल्ह्यात हा ‘गोरखधंदा’ चांगलाच तेजीत
ऐन हंगामात जिल्ह्यात शेतकर्यांना, (farmer) उत्पादकांना बनावट आणि भेसळयुक्त कीटकनाशके, संप्रेरके यांचा फटका बसू लागला आहे. भेसळीचा हा ‘गोरखधंदा’ चांगलाच तेजीत आहे. या औषधांच्या वापराने अपेक्षित ‘रिझल्ट’ मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. कोरडवाहू शेतकर्यांना सातत्याने बनावट बियाणांचा सामना करावा लागतो. यात बनावट, भेसळयुक्त औषधांची भर पडली आहे. जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी भेसळीच्या कृषी औषधांची धुमधडाक्यात विक्री होत आहे. शेतकर्यांना लुटणारा हा ‘गोरखधंदा’ तातडीने रोखण्याची गरज आहे.
जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याकडे वळला आहे. यातून भाजीपाला क्षेत्रात दिवसेंदिवस वाढच होत आहे. जादा उत्पादनासाठी शेतकरी अनेकवेळा परवडत नसतानादेखील महागडी औषधे वापरतो, पण त्याला आता या भेसळयुक्त आणि बनावट कृषी औषधांचा फटका बसत आहे.
बड्या कंपन्या मालामाल
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्याची राज्यभरात भाजीपाला पिकविणारा आघाडीवरील जिल्हा म्हणून ओळख होत आहे. त्याचप्रमाणे भाजीपाल्यातून ताजा पैसा मिळत असल्याने शेतकरी याकडे वळू लागला आहे. भाजीपिकांची जोमाने वाढ व्हावी, फळधारणा व्हावी, वजन वाढावे यासाठी अनेक शेतकरी आर्थिकदृष्टया परवडत नसतानादेखील महागड्या औषधांची फवारणी करतात, पण त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. (crime news)
एकीकडे उसाला अपेक्षित दर नसताना, जोडव्यवसाय म्हणून भाजी-फळभाज्या पिकांकडे वळू लागलेल्या शेतकर्याला या भेसळयुक्त कृषी औषधांमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तक्रार करायचा विचार केला तर बड्या कंपन्या याची काडीचीदेखील दखल घेत नसल्याचे सांगण्यात आले.
संबंधित औषध कंपन्या जबाबदारी झटकत राज्यशासनाचा आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग देखील याची फारशी दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी (farmer) करू लागला आहे. अनेक ठिकाणी बनावट औषधांची विक्री करणार्या कंपन्यांविरोधात तक्रार करूनदेखील संबंधित कंपन्यां या तक्रारींची दखल घेत नसल्याचे चित्र आहे.
तीन वर्षांपूर्वी खरीप हंगामात आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही टापूत कापसाच्या बनावट बियाणाचा शेतकर्यांना फटका बसला होता. आता बनावट कृषी औषधांचा फटका बहुसंख्य शेतकर्यांना बसत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादकासमोरील संकटांची मालिका अधिकच गहिरी झाली आहे. मात्र, याकडे यंत्रणा लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे.
भेसळयुक्त औषधांचा बंदोबस्त करा
शेतकरी महागड्या कृषी औषधांची जादा उत्पादनासाठी फवारणी करतो. मात्र, बनावट औषधांतून शेतकर्यांचा फायदा दूरच त्याचा आर्थिक तोटा होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केला. बनावट कृषी औषधांतून शेतकरी, भाजीपाला उत्पादकांची फसवणूक करणार्या कंपन्यांचा मुलाहिजा न ठेवता शासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. तरच असे प्रकार थांबू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.