पालकमंत्री सतेज पाटील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार
(political news) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनाही यासाठी भेटणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागणार आहे.
कोल्हापूर उत्तरवर काँग्रेसचाच हक्क
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जेथे जेथे पोटनिवडणुका झाल्या, तेथे तेथे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलो आहे. कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसची आहे. राष्ट्रवादी व शिवसेना हे महाविकास आघाडीचेच घटक पक्ष आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्यांनी आमच्या सोबत यावे, अशी अपेक्षा आहे.
कै. आमदार जाधव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव बिनविरोध करून संधी द्यावी, यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची वैयक्तिक भेट घेणार आहे. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत बिनशर्त पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणार आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. (political news)
कोल्हापूरला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वेगळ्या विचाराची राजकीय संस्कृती आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांनी साथ दिली तर निश्चितपणे जयश्री जाधव सर्वांना विश्वासात घेऊन पुढच्या काळात काम करतील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या विकासाचे कै. जाधव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे जयश्री जाधव यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने, ईश्वर परमार यांच्यासह इतर उपस्थित होते.