कोल्हापूर जि.प.चे मतदारसंघ निश्चित; विद्यमान इच्छुकांचे धाबे दणाणले

(political news) कोल्हापूर जिल्हा परिषद (गट) व पंचायत समिती (गण) मतदारसंघाच्या प्रारूप रचनेचा आरखडा शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. आराखड्यामध्ये असलेल्या काही किरकोळ त्रुटी दूर करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पूर्वी जिल्हा परिषद सदस्यांची कमीत कमी संख्या 50 तर कमाल मर्यादा 75 होती.

गेल्या तीस वर्षांत 1990 पासून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा विचार करून शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची कमीत कमी संख्या 55 तर जास्तीत जास्त संख्या 85 असणार आहे.

नव्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे 9 तर पंचायत समितीचे 18 सदस्य वाढणार आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेचे 67 मतदारसंघ होते. आता ते 76 होणार आहेत. पंचायत समितीचे 134 मतदारसंघ होते. आता ते 152 होणार आहेत.

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात पाच नगरपंचायती, नगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे ही गावे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत मतदारसंघात असणार नाहीत. ही गावे वगळून नव्या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदारसंघ करण्याचे काम सुरू होते.

त्रुटी दूर करून पुन्हा हा प्रारूप रचना आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांकरिता हा आराखडा जाहीर करून त्यावर हरकती मागविण्यात येतील. हरकती निकाली काढल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांची अंतिम रचना जाहीर करण्यात येईल. (political news)

उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, तहसिलदार अर्चना कापसे, वरिष्ठ लिपिक एस. ए. मोमीन, महसूल सहायक सचिन कांबळे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाचा प्रारुप रचना आराखडा सादर केला.

संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघाच्या प्रारूप रचनेची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी प्रारूप रचना प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *