सांगली : तीन भाजप नगरसेवकांच्या निवडीविरुद्ध याचिका दाखल

कडेगाव नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये तीन प्रभागांमध्ये दुबार मतदान झाल्याने काँग्रेस उमेदवारांचा निसटता पराभव झाला. त्यामुळे प्रभाग 13, 14 व 17 मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करून काँग्रेस उमेदवारांना विजयी घोषित करावे यासाठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जिल्हा न्यायाधीश पोतदार यांनी नोटीस काढली आहे, अशी माहिती अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिली. अ‍ॅड. शिंदे म्हणाले, प्रभाग 13, 14 व 17 मध्ये दुबार मतदान झाल्याने भाजपचे उमेदवार निवडून आल्याचे जाहीर केले गेले आहे.
लेखी व तोंडी आक्षेप घेऊन देखील निवडणूक निर्णय अधिकारी व मतदान केंद्राध्यक्षांनी दुबार मतदान रोखले नाही. त्यामुळे त्या प्रभागातील निवडणूक सदोष झाली आहे.या प्रभागांमध्ये निवडणुकीवेळी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याने काँग्रेस उमेदवारांचा दोन, तीन व पाच अशा थोडक्या मतांनी पराभव झाला. वास्तविक प्रभाग क्रमांक 13 मध्ये चार, प्रभाग 14 मध्ये सहा व प्रभाग सतरामध्ये नऊ मतदारांनी दुबार मतदान केले आहे. नगरपंचायतीची निवडणूक दोन टप्प्यात झाल्याचा गैरफायदा घेऊन हे दुबार मतदान झाले आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिनिधींनी दुबार मतदान होण्याची शक्यता वर्तवून त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी अर्ज दिला होता. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दुबार मतदान झाले आहे.
निवडणूक प्रक्रिया सदोष झाल्याबद्दल या तीनही प्रभागातील काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. भाजपच्या उमेदवारांची झालेली निवड रद्द करून, काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याचे जाहीर होण्याची मागणी केली आहे. प्रभाग 17 मधील पराभूत उमेदवार सुनंदा शिंदे यांनी निवडून आलेले उमेदवार मनीषा राजपूत यांच्याविरुद्ध प्रभाग 13 मधील उमेदवार वनिता पवार यांनी दीपा चव्हाण यांच्याविरुद्ध आणि प्रभाग 14 मधील ऋुतुजा आधाटे यांनी विद्या खांडे यांच्याविरुद्ध हा दावा दाखल केला आहे. निवडणूक निर्णय, अधिकारी, कडेगावचे मुख्याधिकारी व पराभूत उमेदवारांना पक्षकार केले आहे. पुढील सुनावणी दि. 23 फेब्रुवारीस होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *