सांगली : जतमध्ये अखेर शिवरायांचा पुतळा दाखल

गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार झाल्यानंतर पुतळा जत येथे आणण्यास प्रशासनाने विरोध केला होता. परंतु माजी आमदार तथा पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी शनिवारी रात्री सलग चार तास पोलिस अधिकारी व प्रशासन यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर पुतळा जतला नेण्यास परवानगी देण्यात आली. अखेर रविवारी पहाटे पुतळा जतमध्ये दाखल झाला.यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, माजी सभापती सुरेश शिंदे, उमेश सावंत, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप, संतोष मोटे, अभय जमदाडे यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी व शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. यावर्षीच्या शिवजयंतीला शिवाजी महाराज यांचा पुतळा बसणार, हा शब्द अखेर पुतळा समितीने खरा करून दाखवला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुतळ्याच्या श्रेयवादावरून तसे चांगलेच वातावरण तापले होते.

परंतु, पुतळा समितीचे अध्यक्ष, माजी आमदार जगताप यांनी हा पुतळा पोलिस बंदोबस्तात रविवारी पहाटे आणला. मात्र, आता हा पुतळा चबुतर्‍यावर बसवायचा की त्याठिकाणी आणखी काही कालावधी लागणार, याचा निर्णय सोमवारी (दि. 14) जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीत होणार आहे. दरम्यान, शिवप्रेमी व जनतेतून हा पुतळा पूर्वीच्या ठिकाणी असल्याने 19 फेब्रुवारीरोजी पुतळा बसावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा आल्याने जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत छत्रपतींचा पुतळा पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. शिवाय शिवाजी पेठ येथे देखील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेत बसणारा हा पुतळा चबुतर्‍यावर कधी बसवायचा, व अनावरण, लोकार्पण कधी करायचे, कायदेशीर पूर्तता करणे गरजेचे आहे का? यावर प्रशासन व सर्वपक्षीय समिती पुतळा समिती यांच्यात सोमवारी बैठक होऊन याबाबत निर्णय होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *