‘अन्यथा सांगलीतील महावितरणची कार्यालये पेटवून देऊ’ : ‘स्वाभिमानी’चा इशारा
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सांगली जिल्ह्यातील महावितरणची सर्व कार्यालये पेटवून देऊ, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांचा शिल्लक ऊस तात्काळ नेण्यात यावा, सलग १० तास वीज द्या, तसेच वाढीव वीज दरवाढ रद्द करा. उसबिलाची थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी राजू शेट्टी प्रणित स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले, येत्या १५ दिवसांत ऊस बिलाची रक्कम मिळाली पाहिजे. वजनाची काटेमारी थांबली पाहिजे. ऊस तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने च्यावतीने जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव, कवठेमहंकाळ, आष्टा, पलूस, कडेगाव, मिरज, इस्लामपूर, कुमठे फाटा, शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा सांगली जिल्ह्यात उद्रेक निर्माण होईल. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील एक महावितरणचे कार्यालय पेटवून दिले आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात सापही सोडलेले आहेत.
आज केवळ रास्ता रोको आंदोलन केले आहे. यापुढील काळात मागण्या मान्य न झाल्यास सांगली जिल्ह्यातील एकही महावितरणचे कार्यालय ठेवणार नाही. सर्व कार्यालये पेटवून देऊ असा सज्जड इशारा जिल्हाध्यक्ष खराडे यांनी दिला आहे. या आंदोलना दरम्यान तासभर वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती. रास्ता रोको नंतर तहसील कार्यालयासमोर येऊन नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी विटा, तासगाव, कडेगाव तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.