मिरज शासकीय रुग्णालयात गुरुवारपासून नॉन कोविड रुग्णसेवा
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जानेवारी 2020पासून पूर्णपणे ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, सध्या कोविड रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याने या रुग्णालयात गुरुवारपासून (दि. 10) नॉन कोविड (covid) रुग्णसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर यांनी दिली.
डॉ. ननंदकर म्हणाले, ‘कोविडच्या दुसऱया लाटेच्या शेवटी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात नॉन कोविड रुग्णसेवा सुरू करण्यात आली होती; परंतु तिसरी लाट आल्याने या सेवा परत बंद करण्यात आल्या होत्या. शनिवारी (दि. 5) या संदर्भात महाविद्यालयीन परिषद व कोविड व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यात गुरुवारपासून हंगामी स्वरूपात नॉन कोविड रुग्णसेवा 65 टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर स्थापत्य आणि दुरुस्तीविषयक कामकाजाचा आणि कोविड रुग्णसंख्येचा आढावा घेऊन 1 एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने हंगामी स्वरूपात या नॉन कोविड (covid) रुग्णसेवा पूर्ववत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.