सांगली : मार्केट यार्डात हमाल दरवाढीवरुन संघर्ष

 मार्केट यार्डातील महिला कामगार आणि हळदीच्या हमालांच्या दरवाढीवरून व्यापारी आणि हमाल संघटनेमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. हमाली दरवाढीचा कालावधी संपल्यानंतर व्यापारीवर्गातून विरोध होत असल्याने हमाल संघटना आक्रमक झाली आहे.

याबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी हमाल संघटनेचा यार्डात मंगळवारी (दि. 8) मेळावा घेतला जाणार आहे. येथील वसंतदादा पाटील मार्केट यार्डात हळद, गूळ, मिरची, आदी शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक होते. यासाठी सुमारे दीड हजारावर हमाल काम करीत आहेत.

या हमालांना योग्य हमाली मिळावी, यासाठी हमाल संघटना आणि व्यापार्‍यांमध्ये ठरल्याप्रमाणे दरवाढीचा करार होतो. सध्या महिला कामगाराच्या मजुरीचा करार नोव्हेंबरमध्ये संपला आहे. या महिलांना सध्या दिवसाला फक्त 263 रुपयेच मजुरी मिळते.

वाढत्या महागाईमुळे मिळणारी मजुरी कमी असल्याने यामध्ये किमान पन्नास टक्के वाढ देण्याची मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय हळदीमध्ये काम करणार्‍या मालाचा करार 31 डिसेंबर 2020 संपला आहे. गेली दीड वर्षे करार संपूनही त्यांना वाढ देण्यात आली नाही.

हमाल संघटनेने 40 टक्के इतकी वाढ देण्याची मागणी केली आहे. मात्र कोरोना, लॉकडाऊनचे कारण पुढे करून व्यापार्‍यांनी हमालीमध्ये वाढ देण्यास चालढकल सुरू केल्याचा आरोप हमाल संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.

बाजार समिती आणि चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबत मार्ग काढावा, अशी भूमिका घेतली आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याची भावना हमाल संघटनेच्या नेत्यांमध्ये झाली आहे.

मागणी करूनही व्यापारी हमालीमध्ये वाढ देण्यास तयार नसल्याने संघटनेने काम बंद आंदोलन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

दरवाढ न दिल्यास काम बंद : बाळासाहेब बंडगर

हमाल नेते व हमाल संचालक बाळासाहेब बंडगर म्हणाले, ठरल्याप्रमाणे हमालीमध्ये वाढ करण्याची संघटनेची मागणी आहे. मात्र व्यापारी चालढकल करीत आहेत. वाढत्या महागाईमुळे मिळणार्‍या मजुरीमध्ये जगणे अडचणी झाले आहे.

त्यामुळेच दरवाढीची मागणी करीत आहोत. कामबंद करण्याचा संघटनेचा हेतू नाही. दरवाढ द्यावी, एवढीच मागणी असून यामध्ये आज पुढील दिशा ठरविली जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *