काँग्रेस तृणमूलमध्ये विलीन करायची वेळ आलीय

 

भाजपने गुरुवारी पाचपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “भाजपला राष्ट्रीय पातळीवर लढा देण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. काँग्रेस पक्षाचं तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे”, असं विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे. काँग्रेसनं तृणमूलमध्ये विलीन होऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावं, असा सल्ला तृणमूलच्या नेत्यांनी काँग्रेसला देऊ केला आहे. ममता बॅनर्जीच भाजपाचा पराभव करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

“काँग्रेससारखा जुना पक्ष का नाहीसा होत आहे, हे मला समजत नाही. आम्हीही या पक्षाचा भाग होतो. काँग्रेसने टीएमसीमध्ये विलीन व्हावे. हीच योग्य वेळ आहे. मग राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांवर आपण (नथुराम) गोडसेच्या तत्त्वांना मात देऊ शकतो”, असं तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्याचे परिवहन व नगर विकास मंत्री फिरहाद हकीम म्हणाले.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही हकीम यांच्याच प्रतिक्रियेची री ओढली. “काँग्रेस भाजपसारख्या शक्तीशी लढू शकत नाही, असे आम्ही खूप दिवसांपासून म्हणत आलो आहोत. भाजपविरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या नेत्याची गरज आहे. काँग्रेसने हे समजून घेतले पाहिजे”, असं कुणाल घोष म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *