कोल्हापूर उत्तर’चे भविष्य फक्त यांच्या हाती!

(political news) कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. या पोटनिवडणुकीत 58 टक्के मतदार 18 ते 49 या वयोगटातील आहेत. वयाची 40 वर्षेही न ओलांडलेल्या मतदारांची संख्या 37 टक्क्यापर्यंत आहे. या निवडणुकीत 2 हजार 900 मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या यादीनुसार ‘उत्तर’साठी 2 लाख 91 हजार 583 मतदार आहेत. दि. 8 मार्चपर्यंत झालेल्या नोंदीनुसार यामध्ये आणखी 158 मतदारांची भर पडली आहे.

चाळिशीच्या आतील 1 लाख 8 हजारांवर मतदार

या मतदारसंघात 18 ते 39 या वयोगटातील 1 लाख 8 हजार 481 इतके मतदार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण 37 टक्के इतके आहे. 18 ते 49 या वयोगटात 1 लाख 70 हजार 158 मतदार असून हे प्रमाण एकूण मतदारांच्या तुलनेत 58 टक्के आहे. 40 ते 59 या वयोगटातील मतदारांचे प्रमाण 39 टक्के आहे.

पुरवणी मतदार यादीसाठीअजूनही करता येणार नोंदणी

ज्याला 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झाली तसेच अद्याप नोंदणी न केलेल्या मतदारांनाही मुदतीत मतदार नोंदणी करता येईल. दि.24 मार्च रोजी पुरवणी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तत्पूर्वी सात दिवस पूर्वीपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. ही पुरवणी यादीही मतदानांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. (political news)

महिला मतदारांची संख्या अधिक

या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपैकी अधिक आहे. 8 मार्च अखेरच्या नोंदीनुसार 1 लाख 45 हजार 718 पुरुष तर 1 लाख 46 हजार 11 महिला मतदार आहेत. 80 वर्षांवरील मतदारांची संख्या मात्र, दोन महिन्यांत दोनने कमी झाली. जानेवारीत या वयोगटातील 11 हजार 275 मतदार होते, मार्च महिन्यात ते 11 हजार 273 इतके झाले आहेत. 95 सर्व्हिस व्होटर (सैनिक मतदार) आहेत तर मतदार म्हणून 12 तृतीयपंथी व्यक्तींचीही मतदार यादीत नोंद आहे.

18 ते 49 वयोगटातील 58 टक्के मतदार; 2 हजार 900 प्रथमच करणार मतदान

वयोगटानुसार मतदार (5 जानेवारी 2022 नुसार)
वयोगट मतदार संख्या –

18 ते 19 वर्षे 2896
20 ते 29 वर्षे 46257
30 ते 39 वर्षे 59328
40 ते 49 वर्षे 61677
50 ते 59 वर्षे 53185
60 ते 69 वर्षे 36319
70 ते 79 वर्षे 20502
80 ते 89 वर्षे 8769
90 ते 99 वर्षे 2374
100 वर्षांवरील 132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *