काँग्रेसचा मतदारसंघ हिसकावून घेणार

(political news) सध्या काँग्रेसकडे असलेला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत हिसकावून घेण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. नागाळा पार्क येथील बालाजी गार्डनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

या बैठकीत आ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. चार राज्यांत भाजपला जे यश मिळाले, यामध्ये शक्ती केंद्र प्रमुख व त्याअंतर्गत काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे परिश्रम आहेत. मोठ्या नेत्यांच्या सभा न होता देखील दोन नंबरच्या फळीतील कार्यकर्ता निवडणुका जिंकून देऊ शकतो हेच चार राज्यांतील निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. हेच कार्यकर्ते भाजपचे शक्ितस्थान आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. हा मतदारसंघ यावेळी आपणास हिसकावून घ्यायचा आहे. यामध्ये शक्ती प्रमुखांची जबाबदारी महत्त्वाची आहे, असे सांगितले.

या पोटनिवडणुकीसाठी 77 शक्ती केंद्र प्रमुख कार्यरत असून त्यांच्या मदतीला शेजारच्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी येणार आहेत. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, उत्तरेश्वर, मंगळवार पेठ, कसबा बावडा असे मंडल तयार करण्यात आले आहेत. एका मंडलमधील कार्यकर्त्यांसोबत एक आमदार असणार आहे. या पोटनिवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून सुनील कर्जतकर काम पाहणार आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. बैठकीस माजी आ. सुरेश हाळवणकर, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, माजी खा. धनंजय महाडिक, विजय जाधव, सुनील कदम, अशोक दसाई, विजय खाडे आदी उपस्थित होते. (political news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *