सांगली जिल्ह्यातील ५ कारखान्यांचा बिगुल वाजला
कोल्हापूर विभागातील सात कारखान्यांच्या निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कोल्हापूर विभागातील सात सहकारी कारखान्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश साखर आयुक्तांना दिले आहेत. आज साखर सहसंचालकांना याबाबतचा आदेश कार्यालयाला प्राप्त झाला आहे. यात सांगली जिल्ह्यातील माणगंगा आटपाडी, राजारामबापू साखराळे, निनाईदेवी कोकरूड आणि सध्या प्रशासक असलेले बंद असलेले डफळे जत, यशवंत खानापूर, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी, अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज या साखर कारखान्यांचा समावेश आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे
कोल्हापूर विभागातील आठ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. कोविडमुळे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आज निवडणूक प्राधिकरणाने साखर आयुक्त कार्यालयाला निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आदेश दिला. २०२१ मधील १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू करून ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.
सभासद यादी एक एप्रिलपासून मागवली जाणार आहे. ‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधींनी ठराव मागविला जाईल. सहसंचालक ही यादी कारखान्यांना देतील. यानंतर कारखाना प्रारूप किंवा ‘अ’ वर्ग कच्ची सभासद यादी सहसंचालक कार्यालयाला देतील, यानंतर सहसंचालक कार्यालय यादी प्रसिद्ध करेल. हरकती, सुनावणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.५ एप्रिल ते ५ मेपर्यंत ‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधी ठराव प्रक्रिया राबविली जाईल. ५ जूनपर्यंत कच्ची, पक्की यादी होईल. २५ ते ३० जून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल. दरम्यान, जूनमधील निवडणुका पुढे जाण्याचीही शक्यता आहे.
साखर कारखान्यांच्या निवडणुकीचे आदेश प्राप्त झाले आहेत. १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे कारखान्यांकडून ‘ब’ वर्ग उत्पादक सभासद यादी मागवली जाईल.