सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा द्राक्ष बागांचे नुकसान
वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ( unseasonal rain lashes in sangli ) जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सांगली शहरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मिरज तालुक्यातील पूर्व भागासह अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. दुसर्या बाजूला द्राक्ष शेतकरयांची चिंता वाढली आहे. द्राक्षासह बेदाणा उत्पादनाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
सांगली शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाने पुन्हा फटका बसला आहे. सांगली-मिरज शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मंगळवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. सांगली आणि मिरज शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचून राहिलं होतं. अचानक पडलेल्या या पावसाने सांगलीकरांची चांगलीच दैना उडाली. या पावसाने मोठ्या प्रमाणात हवेत गारवा निर्माण होऊन, उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस पडला. मिरज तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. मालगाव याठिकाणी तुफान गारपीट झाली आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागातल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बेदाणा आणि द्राक्ष उत्पादनाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतोय.