सांगली : ‘महाराष्ट्र केसरी’त जिल्ह्यातील तिघे चमकले
सातारा येथे रंगलेल्या 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तिघा मल्लांनी ब्राँझ पदकांवर आपले नाव कोरले.
सांगली जिल्ह्यातील जवळपास 20 कुस्तीगीर विविध वजनी गटातून या स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र एक मल्ल खेळू शकला नाही. एकोणीस कुस्तीगीर यात सहभागी झाले होते. यातील 92 किलो वजनी गटात क्रांती सहकारी साखर कारखान्याचा मल्ल भारत पवार याने ब्राँझ पदक पटकावले.पासष्ट किलो वजनी गटात बेणापूर येथील बेणापूर कुस्ती केंद्राचा मल्ल नाथा पवार याने ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले. सत्तावन्न किलो वजनी गटात सुरूल (ता. वाळवा) येथील राहुल पाटील याने ब्राँझ पदक पटकावले. या मल्लांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष तथा सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते, जिल्हा तालीम संघाचे सरचिटणीस प्रा. प्रतापराव शिंदे आदी पदाधिकार्यांचे मार्गदर्शन लाभले.