सांगली शहरात पाणी टंचाई; अघोषित भारनियमन

उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना अघोषित भारनियमनामुळे शहरात पाणी टंचाईचा प्रश्न वाढत आहे. नागरिकांचा रोष वाढत आहे. दरम्यान, महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित विद्युत पुरवठ्याचे एक्सप्रेस फिडर खंडित करू नयेत. अखंडित वीज पुरवठा करावा, असे पत्र महानगरपालिकेने महावितरणला धाडले आहे.

कर्नाळ रोड जॅकवेल, माळबंगला जलशुद्धीकरण केंद्र, हिराबाग वॉटर हाऊस, जिल्हा परिषदजवळील पंप हाऊस, चौकोन टाकी पंपहाऊस, यशवंतनगर पंपहाऊस, विश्रामबाग पंपहाऊस असे एकूण 7 ठिकाणी एक्सप्रेस फिडरद्वारे विद्युतपुरवठा होतो. अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी महानगरपालिकेने एक्सप्रेस फिडरचे वीज कनेक्शन घेतलेले आहे. मात्र एक्सप्रेस फिडरद्वारे होणारा विद्युत पुरवठा अनेकदा खंडित होतो.

महावितरणने महानगरपालिकेला कोणतीही पूर्व सूचना न देता दि. 11 एप्रिल रोजी पहाटे 2.40 ते 4.45 असे एकूण 2 तास 5 मिनिटे इतका वेळ वीज पुरवठा खंडित केला होता. दर मंगळवारी वीज पुरवठा खंडित केला जातो. परिणामी पाणी पुरवठा विभागास लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. दुरुस्ती काम निघाल्यास पाणीपुरवठा विभागास पूर्व कल्पना दिली जात नाही. पाणीपुरवठा अतिआवश्यक सेवा असल्याने विद्युत पुरवठा अखंडित सुरू राहणे गरजेचे आहे.

सध्या उन्हाळा सुरू आहे. पाण्याची मागणीही वाढली आहे. अशा परिस्थितीत शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग दक्षता घेत आहे.

जॅकवेल ते पंपहाऊस; 7 एक्सप्रेस फिडर

कर्नाळ रोड जॅकवेल, माळबंगला जलशुद्धीकरण केंद्र, हिराबाग वॉटर हाऊस, जि. प. जवळील पंप हाऊस, चौकोन टाकी पंपहाऊस, यशवंतनगर पंपहाऊस, विश्रामबाग पंपहाऊस असे 7 ठिकाणी एक्सप्रेस फिडरद्वारे वीज पुरवठा होतो.

गावभाग, खणभाग, नळभाग, वखारभाग, पत्रकारनगरला 15 लाख लिटर जादा पाणी

हिराबाग वॉटर हाऊस येथे जुनी 20 लाख लिटर व नवीन 25 लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. या दोन टाक्या एकत्र जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एका टाकीतील सुमारे 15 लाख लिटर पाण्याचा वापर होत नव्हता. या दोन टाक्या जोडल्यानंतर गावभाग, खणभाग, पत्रकारनगर, नळभाग, वखारभाग व परिसराला 15 लाख लिटर पाणी जादा मिळणार आहे. नागरिकांना हा मोठा दिलासा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *