हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट्स
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनंही आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर काल खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सला 37 धावांनी पराभूत केलं. गुजरातच्या विजयात राजस्थाननं महत्वाची भूमिका गमावली. दरम्यान, पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवून गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यातच गुजरातच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. ज्यामुळं त्याला मैदानही सोडावं लागलं होतं. याच पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याच्या दुखापती बाबत महत्वाची अपडेट्स आली आहे.
राजस्थान विरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. त्याचं षटक विजय शंकरनं पूर्ण केलं. यामुळं पुढील काही सामन्यातून हार्दिक पांड्या मुकणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. या दुखापतीबाबत हार्दिकनं स्वत:ची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ‘विजय नेहमीच खास असतो. मला फक्त क्रॅम्प आला होता, हे इतकं गंभीर नाही. मला तेवढी फलंदाजी करायची सवय नाही. पंरतु, राजस्थानविरुद्ध सामन्यात मला चांगली गती मिळाली. त्यानंतर मी मोठी धावसंख्या उभी करण्याचं ठरवलं. कर्णधारपद नेहमी आकर्षक असंत. ज्यामुळं तुम्ही वेगळ्या पद्धतीनं संघाचं नेतृत्व करायला मिळतं. गुजरातचा संघ चांगला खेळत आहे, असंही हार्दिकनं म्हटलं आहे.
आयपीएल 2022 च्या 24 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातनं 20 षटकांत चार विकेट्स गमावून राजस्थान रॉयल्ससमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. संघाच्या वतीनं कर्णधार हार्दिक आणि अभिनव मनोहर यांच्यात 55 चेंडूत 86 धावांची शानदार भागीदारी केली. राजस्थानला पराभूत करून गुजरातच्या संघानं गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत आहेत. गुजरातनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यापैकी चार सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.