सांगली महापालिका महासभेमध्ये गदारोळ

महानगरपालिकेच्या महासभेत (General Assembly) सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावरून औचित्याच्या मुद्द्यावर (पाईंट ऑफ ऑर्डर) चर्चा करावी, मतदान घ्यावे, या मागणीसाठी भाजप व काँग्रेसचे बहुसंख्य नगरसेवक आक्रमक झाले, तर त्याविरोधात विषयपत्रिकेवरील विषय घ्या, अशी मागणी करत राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही सदस्य आक्रमक झाले. महापौरांसमोर एकत्र येत दोन्ही गट भिडले. भाजपचे काही नगरसेवक महापौरांच्या अंगावर धावले. या सर्व गोंधळात महापौरांनी सर्व विषय मंजूर करत सभा गुंडाळली.

महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, संतोष खांडेकर, नगरसचिव चंद्रकांत आडके तसेच पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

दोन गट आक्रमक

‘दि. 18 फेब्रुवारीची महासभा बेकायदेशीर असून त्या सभेत मंजूर केलेले सर्व विषय रद्द करावेत. त्यासाठी मतदान घ्यावे’, असा औचित्याचा मुद्दा भाजपच्या नगरसेविका सविता मदने यांनी मांडला. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी त्यांना साथ दिली. दरम्यान औचित्याच्या मुद्याला महापौर सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला. मागील सभेचे कार्यवृत्त (इतिवृत्त) वाचून कायम करण्याचा विषय हा या महासभेच्या विषयपत्रकावर पहिलाच विषय आहे. त्यामुळे औचित्याचा मुद्दा घेण्याचा गरजच नाही, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यावर भाजप तसेच काँग्रेसचे बहूसंख्य नगरसेवक आक्रमक झाले. औचित्याचा मुद्दा चर्चेला व मतदानाला घ्यावा, अशी आग्रही मागणी केली. महासभेत (General Assembly) नगरसेवकांचे दोन गट झाले आणि जोरदार वादावादीस सुरूवात झाली. प्रचंड गदारोळ सुरू झाला.

औचित्याचा मुद्दा घ्यावा यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार, सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, सदस्य धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, जगन्नाथ ठोकळे, सविता मदने, अ‍ॅड. स्वाती शिंदे, संगीता खोत, अनारकली कुरणे विशेष आक्रमक होते. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील, मनोज सरगर व काही नगरसेवकही आक्रमक होते. औचित्याच्या मुद्यावर मतदान घ्या, अशी मागणी संतोष पाटील यांनी केली. तर काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण, मयुर पाटील, तौफिक शिकलगार, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक शेडजी मोहिते, विष्णू माने, हरिदास पाटील व नगरसेवक विषयपत्रिकेवरील विषय घेण्यासाठी आग्रही राहिले. या सर्व प्रकारात प्रचंड गदारोळ झाला.

काँग्रेस, राष्ट्रवादी गटनेत्यात वाद

विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करून सभा संपवा, असे राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी महापौर सूर्यवंशी यांना सूचवले. त्यावरून काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे व बागवान यांच्यात वाद सुरू झाला. दरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही सदस्यांनी बागवान यांच्या सुरात सूर मिसळला. महापौरांनीही सर्व विषय मंजूर झाले असून सभा संपल्याचे जाहीर केले.

महापौरांना घेराव; निषेधाच्या घोषणा

सर्व विषय मंजूर झाले असून सभा संपल्याचे जाहीर करत महापौर सूर्यवंशाी हे सभागृहाबाहेर पडू लागताच भाजपच्या नगरसेवकांनी त्यांनी घेराव घातला. महापौर तिथून मागे आले आणि डाव्या बाजुच्या प्रवेशद्वारातून सभागृहाबाहेर पडले. भाजपच्या नगरसेवकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. महापौर पळपुटे अशी घोषणाबाजी सुरू झाली.

बंद दाराआड चर्चा

महासभा सुरू व्हावी यासाठी काँग्रेसचे गटनेते मेंढे हे महापौर दालनात महापौर सूर्यवंशी यांना भेटले. तेथे राष्ट्रवादीचे प्रमुख सदस्यही उपस्थित होते. तिथे गरमागरम चर्चाही झाल्याचे समजते. मेंढे हे महापौर दालनातून बाहेर पडत सभागृहात आले.

‘भाजप-काँग्रेस’ एकत्र; समांतर सभा

काँग्रेस व भाजप नगरसेवकांची समांतर सभा झाली. या सभेला 53 नगरसेवक उपस्थित होते, असा दावा भाजप व काँग्रेसच्य गटनेत्यांनी केला. दरम्यान राष्ट्रवादीच्या बेकायदा सभा कामकाजाला तसेच यापुढे चुकीची धोरणे, निर्णयांना एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, शेखर इनामदार यांनी समांतर सभेत घेतला.

काँग्रेस फुटली

महासभेत काँग्रेसचे 6 नगरसेवक तसेच भाजपचे फुटीर नगरसेवक हे कार्यवृत्त मंजुरीच्या बाजुने म्हणजे राष्ट्रवादीसोबत राहिले. काँग्रेसमध्येही गट पडल्याचे दिसून आले.

काँग्रेसचे हे 6 नगरसेवक इतिवृत्ताच्या बाजूने

काँग्रेसचे मंगेश चव्हाण, मयूर पाटील, फिरोज पठाण, अभिजीत भोसले, तौफिक शिकलगार, वहिदा नायकवडी हे 6 नगरसेवक दि. 18 फेब्रुवारीच्या महासभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याच्या बाजूने राहिले. काँग्रेस-भाजपच्या समांतर सभेला ते उपस्थित राहिले नाहीत. ‘मुस्लिम व ख्रिश्चन समाज दफनभूमीच्या जागेचा विषय मंजूर होणे आवश्यक असल्याने दि. 18 फेब्रुवारीची सभा रद्द करणे अथवा विषय रद्द करण्याच्या मागणीला विरोध आहे. त्यामुळे आम्ही मागील सभेचे इतिवृत्त-कार्यवृत्त वाचून कायम करण्याच्या बाजूने राहिलो, असे या नगरसेवकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *