तुम्ही काय…… ; समरजितसिंह घाटगे यांचा ना. मुश्रीफांवर हल्‍लाबोल

(political news) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्या संबंधिताचे पुरावे गोळा केले आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी मीच सोमय्यांना माहिती पुरवित असल्याचा आरोप केला आहे, पण त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. मी कधी पाठीमागून वारही करीत नाही. तुम्ही गेली तीस वर्षे राज्यकारभारात आहात. म्हणजे तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे नाही! हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे मी आता तुमची भ्रष्टाचाराचाची सर्व प्रकरणे बाहेर काढल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा ईशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी एकोंडी येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिला.

तुम्हीच खरे जातीयवादी आहात-समरजितसिंह घाटगे

घाटगे म्हणाले, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांच्या बोटाला धरून मुश्रीफ तुम्ही राजकारणात आला. तेथूनच मोठे झालात. पण विक्रमसिंह घाटगे यांच्याशी फारकत घेऊन माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी जवळीक साधली. मंडलिकांनी आपल्या मुलाला बाजूला सारून तुम्हाला आमदार केले. पण त्यांचा ही तुम्ही विश्‍वासघातच केल्याचा आरोपही समरजितसिंह घाटगे यांनी केला. स्व. विक्रमसिंह घाटगे व स्व. खासदार मंडलिक यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केले आहे, असा आरोपही घाटगे यांनी केला. (political news)

कागलच्या श्री राममंदिराला राजकीय अड्डा बनवला, असा माझ्यावर आरोप करीत सुटला आहात. कागलचा गैबी सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान आहे. तेथे तुम्ही कट्ट्यावर उभे राहून राजकीय भाषण ठोकता. तो तुमचा राजकीय अड्डा होत नाही का? असा सवाल घाटगे यांनी केला. तुम्हीच खरे जातीयवादी आहात. भ्रष्टाचाराचा तर तुमचा कळस आहे. तुमची सर्व प्रकरणे बाहेर काढल्याशिवाय आता गप्प राहणार नाही. यावेळी ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक सुनील मगदूम, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *