“….यांनी अडीच वर्ष अशीच काढली आणि महाराष्ट्राला संकटात टाकलं”
(political news) एक व्यक्ती जो राज्याचं प्रतिनिधीत्व करतो जो राज्याचा प्रथम नागरिक म्हणून मानला जातो असा व्यक्ती दोन-अडीच वर्ष मंत्रालयात जात नाही. मग राज्याला लागलेली साडेसाती आणि शनी कसा दूर होणार? एखादा कर्मचारी जर कामावर दोन वर्ष गेला नाही. तर त्याला कुणी पगार देणार नाही. पण राज्यात आज बिनकामी पण पूर्ण पगारी मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी आजवर कोणतंही काम केलेलं नाही. अडीच वर्ष यांनी अशीच काढली आणि महाराष्ट्राला संकटात टाकलं, असा थेट हल्लाबोल खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी जाहीर केलं होतं. त्यावर शिवसेनेकडून राणा दाम्पत्यानं मुंबईत येऊन दाखवावं असं आव्हा न देण्यात आलं आहे. शिवसेनेचं आव्हान स्वीकारत राणा दाम्पत्य आज मुंबईत दाखल झालं असून मुंबई पोलिसांनी त्यांना मातोश्री परिसरात न जाण्याची नोटीस बजावली आहे. याबाबत राणा दाम्पत्यानं पत्रकार परिषद घेत कोणत्याही परिस्थितीत उद्या मातोश्रीवर जाणारच असा आक्रमक पवित्रा घेत हनुमान चालीसा पठण करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे.
राणा दाम्पत्याकडून स्टंटबाजी केली जात असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नवनीत राणा यांनी आम्हाला स्टंटबाजी करण्याची काहीच गरज नाही. आता कोणती निवडणूकही नाही आणि मी जनतेत १६ तास राहून त्यांची कामं करुन खासदार झालेली आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही मोठे झालो आहोत. पण हेच विचार आज शिवसैनिक विसरले आहेत. त्यांनी आम्हालाच मुंबईत पाय ठेवून दाखवायचं आव्हान दिलं. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंचे शिवसैनिकच कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत, असं नवनीत राणा म्हणाल्या. (political news)
मुख्यमंत्री बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री
नवनीत राणा यांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. “मुख्यमंत्र्यांना किती काम असलं पाहिजे. खरंतर मंत्र्यांच्याच टेबलवर फाइलचा ठिग असतो. मग मुख्यमंत्र्यांसमोर किती काम असलं पाहिजे याचा अंदाज येईल. पण आपले मुख्यमंत्री कार्यालयात जायला मागत नाहीत. दोन-अडीच वर्षांनी मुख्यमंत्री कार्यालयात जातात. म्हणजे कसं काम चाललंय पाहा. बाळासाहेबांचे विचार ऐकूनच लहानाचे मोठे झाले आहे. त्यामुळे हनुमान चालीसा वाचण्यासाठी आम्हाला कुणी अडवू शकत नाही. बाळासाहेबांनी पदासाठी कधीच विचारधारा सोडली नाही. आज शिवसैनिकच कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. बाळासाहेबांसोबतच त्यांची विचारधाराही गेली. शिवसेनेची विचारधारा आज महाविकास आघाडीची विचारधारा झाली आहे. बाळासाहेबांची विचारधार असती तर आज उद्धव ठाकरेंनी स्वत:हून आम्हाला मातोश्रीवर येऊ दिलं असतं आणि आमच्यासोबतच हनुमान चालीसा पठण केलं असतं”, असं नवनीत राणा म्हणाल्या.
स्टंटबाजीची गरज आम्हाला नाही
“आम्ही १६ तास जनतेत राहून काम करुन निवडून आलेले आमदार आणि खासदार आहोत. बाळासाहेबांच्या विचारांनीच आम्ही मोठे झाले आहोत. निवडणुक देखील जवळ नाही. त्यामुळे स्टंटबाजीचा मुद्दाच नाही. शिवसेनेलाच पराभूत करुन मी माझ्या मतदार संघात निवडून येते आणि भाजपाशी नाव जोडून आमची बदनामी करू नये. जर स्टंट बाजी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हनुमान चालीसाला विरोध का करत आहात? याचं उत्तर द्यावं”, असं नवनीत राणा म्हणाल्या.
संजय राऊत पोपट, रोज सकाळी उठून बडबडतात
संजय राऊतांनी तुमचा उल्लेख बंटी-बबली असा केला आहे. असं विचारलं असता नवनीत राणा यांनी संजय राऊत हे तर पोपट आहेत. रोज सकाळी पत्रकारांना बोलावून बडबड करायची. त्यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नसतं. शिवसेनेला हरवूनच मी खासदार झाले आहे. त्यांनी स्टंटबाजीची भाषा आमच्याशी करू नये, असं नवनीत राणा म्हणाल्या.