‘…तर कितीही मोठा नेता असला तरी पक्षातून हकालपट्टी करुन टाकू’

(political news) तेलंगणामध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्व राजकीय पक्ष मात्र आतापासूनच तयारीला लागले आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी देखील पक्ष बांधणी आणि प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. नुकतंच राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मोठ्या रॅलीला संबोधित केलं. याच रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर करुन टाकलं आणि कोणत्याही परिस्थितीत टीआरएससोबत हातमिळवणी करणार नाही असंही स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधी यांनी टीआरएससोबतच्या हातमिळवणीबाबतचे कोणतेही प्रयत्न आणि चर्चा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्या व्यक्तीनं तेलंगणाला धोका दिलाय. ज्यानं इथं चोरी केली आणि राज्याच्या स्वप्नांची माती केली अशा व्यक्तींसोबत काँग्रेस कधीच हातमिळवणी करणार नाही. तसंच हा प्रश्न आता यापुढे कोणत्याही काँग्रेस नेत्यानं उपस्थित केला. तर त्या काँग्रेस नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. मग तो कुणीही असो, कितीही मोठा नेता असो. आम्ही त्यांना पक्षातून बाहेर काढू”, असा रोखठोक इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

टीआरएससोबत इतर कोणत्याही पक्षानं हातमिळवणी करू नये असंही राहुल गांधी यांनी आवाहन यावेळी केलं. तेलंगणामध्ये भाजपच चंद्रशेखर राव यांना समर्थन देत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. “मी याआधीही सांगितलंय की ज्या काँग्रेस नेत्याला असं वाटतं की टीआरएससोबत युती व्हावी अशा नेत्यानं भाजपा किंवा टीआरएसमध्ये जावं. कारण जर युती जर आहे तर ती भाजपा आणि टीआरएसमध्ये झालेली आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी कायदे लागू केले होते तेव्हा टीआरएस नेते काय म्हणत होते हे लक्षात आहे ना?”, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. (political news)

केंद्रात भाजपाचं सरकार आहे आणि त्यांचा टीआरएसला पाठिंबा आहे. त्यामुळे तेलंगणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ शकतो. मुख्यमंत्री काहीही करू शकतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सीबीआय, ईडीची कारवाई होणार नाही, असाही टोला राहुल गांधी यांनी यावेळी लगावला. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार येताच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं आश्वासन देतानाच छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत याचाही दाखला राहुल गांधी यावेळी दिला. छत्तीसगडमध्ये शेतमालाला चांगला भाव मिळाला आणि शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ केलं असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *