पश्चिम महाराष्ट्रावर यंदा महापुराचे संकट

अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली बांधकामे पश्चिम महाराष्ट्रातील महापुराला (flood) कारणीभूत ठरतात, यावर शिक्कामोर्तब झालेलेच आहे. शिवाय, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकत्रित धरण परिचलन योजनेला अजूनही मूर्त स्वरूप आलेले नाही. तशातच पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या प्रवाह मार्गावर कर्नाटक हद्दीत काही नवीन पूल आणि नवीन रस्ते झालेले आहेत, होत आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा या भागातील महापुराचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे या भागात महापूर येतो, असा निष्कर्ष आजपर्यंत तीन-तीन समित्यांनी काढलेला आहे. 2005 सालच्या महापुरानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईच्या तीन सदस्यांची एक समिती या महापुराचा आणि त्याच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती. या समितीने इथल्या महापुराला अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरच कारणीभूत आहे, असा निष्कर्ष आपल्या अहवालात दिलेला आहे. 2019 च्या महापुरानंतर ‘साऊथ एशिया नेटवर्क ऑफ डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ऑर्गनायझेशनने या भागातील महापुराची पाहणी करून आपला अहवाल दिला आहे. या अहवालातही अलमट्टी धरणातील पाणी पातळी आणि नियमानुसार न होणार्‍या विसर्गावर बोट ठेवून या महापुराला अलमट्टी धरणच कसे कारणीभूत आहे, ते अधोरेखित केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीला प्रामुख्याने अलमट्टी-हिप्परगी धरणांप्रमाणेच कोयना, वारणा, धोम, कन्हेर, राधानगरी आणि दूधगंगा धरणांमधून होणारा अनियमित विसर्गही कारणीभूत ठरतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संबंधित सर्व धरणांची ‘एकात्मिक धरण परिचलन योजना’ राबविण्याची चर्चा झाली आहे; पण अजूनही त्याला मूर्त स्वरूप आलेले नाही.

पुणे-बंगळूर महामार्गाच्या कामातदरम्यान, टाकण्यात आलेला प्रचंड भराव, चुकीच्या पद्धतीने झालेली पुलांची उभारणी, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात उभारण्यात आलेले अडथळे, सीमाभागात चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेले रस्ते हे घटकही महापुराला (flood) कारणीभुत आहेत. दरम्यान, 2005, 2019 आणि 2021 साली कृष्णा-वारणा-पंचगंगा नद्यांना आलेल्या महापुरामुळे कर्नाटकचेही मोठे नुकसान झाले.

रस्ते, पूल बांधकामासाठी टाकलेले भराव धोकादायक

कर्नाटक सरकारचा प्रस्तावित अकिवाट-आलास पूल, त्याच्या पुढे दोन किलोमीटरवर पूर्वीचा राजापूर बंधारा आहे. त्यापुढे एक किलोमीटरवर पूर्वीचा राजापूर-अकिवाट हा पूल आहे. पुढे दोन किलोमीटर अंतरावर खिद्रापूर-जुगुळ हा पूल उभारत आहेत. त्यापुढे लगेच पूर्वीचा राजापूर-टाकळी पूल आहे. पुढे एक किलोमीटर अंतरावर कर्नाटक शासन टाकळी-चंदूर पूल उभारत आहे. त्याच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर कर्नाटक शासन कल्लोळ-यड्डूर बंधारावजा पूल आणि आणखी बांधकामे होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *