खासदारकीसाठी संभाजीराजे छत्रपतींना महाराष्ट्रातील पहिल्या आमदाराने जाहीर केला पाठिंबा
येत्या १० जून रोजी होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना राज्यातील पहिल्या आमदाराने पाठिंबा जाहीर केला आहे. उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी आमदार बालदी यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरी केली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले. तसेच राज्य समन्वयक अंकुश कदम व धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार दोन जागांवर भाजप, तर प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार सहजपणे निवडून येईल. मात्र, सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे संख्याबळ नाही. याच सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी दावा सांगितला होता. गेल्या सहा वर्षांमध्ये मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांना मला निवडून द्यावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले होते. यावेळी त्यांनी अपक्ष आमदार आणि लहान राजकीय पक्षांनाही साद घातली होती.
राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी त्यांच्या सोबत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे . स्वराज्य संघटनेची स्थापना करत त्यांनी या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरे जाताना महाविकास आघाडी बरोबरच भाजपनेही आपल्याला मदत करावी असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदाराने त्यांना पहिला पाठिंबा दिला आहे.
संभाजीराजेंची खासदारकी भाजपच्याच हातात
भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून मदत झाली तरच पुन्हा खासदार होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी नेत्यांच्या मनात संभाजीराजेंविषयी सॉफ्टकॉर्नर आहे. पण केवळ त्यांच्या मतावर निवडून येणे शक्य नाही. सहावी जागा ‘अर्थ’ कारणावर अवलंबून आहे. यामुळे ते टाळण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तर मात्र सहाव्या जागेसाठीची लॉटरी संभाजीराजेंना लागण्याची शक्यता आहे.