3 वर्षांनंतर पोलिस भरती; 15 जुनपासून प्रक्रिया सुरू

स्पर्धा परीक्षांचे (Competitive Exam) क्लास लावले, रोज सकाळी उठून धावणे अन् मैदानावर सरावही केले; पण तीन वर्षांपासून पोलिस भरती (Police Recruitment) होत नसल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड होत होता. अखेर या तयारीला कुठेतरी फळ मिळणार असून, येत्या १५ जूनपासून राज्यात सात हजार जागांच्या पोलिस भरतीला सुरवात होणार आहे. त्यामुळे तरुणाईच्या अपेक्षा वाढल्या असून, भरतीच्या दृष्टीने सर्व पातळीवर तयारी सुरू आहे पोलिस दलातील (Police Department) रिक्त जागांसाठी १५ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याअंतर्गत विविध पदांसाठी सुमारे सात हजार जागा भरण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भविष्यात १५ हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात केली. भरतीसाठी दोन-तीन वर्षांपासून तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांकडून भरती प्रक्रियेच्या तारखेची काही दिवसांपासून वाट पाहिली जात होती. आता तारीख निश्चित झाल्याने पुन्हा एकदा तरुणाई जोमाने तयारीला लागली आहे. २०१४ मध्ये राज्यात मोठी पोलिस भरती झाली होती. त्यानंतर २०१६ ते २०१९ या काळात फक्त रिक्त पदांची भरती झाली. २०१९ नंतर एकही पद भरले गेले नसल्याने रिक्त जागांसह इतर जागांचीही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. त्यामुळे बारावी, पदवी उत्तीर्ण होऊन पोलिस भरतीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.
रोज सकाळी उठायचे, दोन-तीन किलोमीटर पळायचे, व्यायाम करायचा नंतर दिवसभर घरी किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेत जाऊन लेखी परीक्षेची तयारी करायची, असे २०१९ पासून अनेक तरुण नित्यनियमाने तयारी करत आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेल्यानंतर काही तर वयोमानानुसार बादही झाले आहेत. आता पुन्हा नव्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यात भर पडल्याने या भरतीसाठी लाखो तरुण रिंगणात उतरतील, अशी अपेक्षा आहे.
◆ गेल्या वर्षी नाममात्र भरती

२०१९ ला पोलीस भरती निघाली अन फॉर्म भरले गेले. मात्र पुढे लॉकडाऊन आले. ती भरती प्रक्रिया २०२१ अखेर व २०२२ वर्षाच्या सुरवातीला पार पडली. त्यात नाममात्र प्रमाणात भरती झाली. मात्र २०१९ ला फॉर्म भरलेल्या मुलांना संधी मिळाली, तर २०१९ नंतर नवीन मुलांना तयारी असतानाही संधी मिळाली नसल्याने या भरतीसाठी अनेकजण तयारीत आहेत.

शेतकरी, कष्टकरी मजूर, व्यावसायिक व नोकरी करणाऱ्या कुटुंबातीलच विद्यार्थी पोलिस, सैनिक भरतीची तयारी करतात. आई-वडील रक्ताचे पाणी करून त्यांना शिकवतात. आम्ही नवचेतना ॲकॅडमीकडून माफक दरात मार्गदर्शन करतो. मुले रात्रंदिवस तयारी करतात; पण भरतीत सातत्य नसल्याने अनेकांची संधी जाते. आता भरती जाहीर झाल्याने आनंद आहे. शासनाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित संधी द्यावी. वेळेवर दर वर्षी भरती प्रक्रिया राबवून न्याय द्यावा. – जितेश पगारे, संचालक, नवचेतना ॲकॅडमी, येवला

चार वर्षांपासून रात्रीचा दिवस करून परिपूर्ण तयारी करूनही आम्हाला संधी मिळत नव्हती. आता महाविकास आघाडीने उपलब्ध केलेल्या या संधीचे आम्ही नक्कीच सोने करू. शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण करत टप्प्याटप्प्याने पोलिस भरती प्रक्रिया पार पाडावी व मोठ्या कष्टाने तयारी करणाऱ्या तरुणांना न्याय द्यावा. – अमोल खैरनार, अंदरसूल, स्पर्धा परीक्षा अभ्यासक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *