मिरज : सव्वा कोटीचा गांजा जप्‍त

शिपूर (ता. मिरज) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने उसाच्या शेतावर छापा टाकून दोन ट्रक गांजा जप्‍त करून गांजाची शेती उद्ध्वस्त केली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही कारवाई करण्यात आली. गांजाची 400 झाडे उपटून काढून ती जप्‍त केली आहेत. त्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. याप्रकरणी शेतकर्‍यास ताब्यात घेण्यात आले आहे. नंदकुमार दिनकर बाबर (वय 40, रा. शिपूर) असे अटक केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्याने 30 गुंठ्यांमध्ये उसाची लागण केली आहे. यातच त्याने मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सहा वाजता शेतात छापा टाकला. तत्पूर्वी, शेतकरी नंदकुमार बाबर याला ताब्यात घेण्यात आले होते.

शेतातच मोजदाद

बाबरला घेऊनच पथक शेतात गेले. सभोवताली गांजाची झाडे पाहून पथकही चक्रावून गेले. त्यानंतर पथकाने मिरज ग्रामीण पोलिसांना पाचारण केले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गांजाची झाडे उपटून काढण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या झाडांची मोजदाद सुरू होती. जवळपास चारशे झाडे असल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत सव्वाकोटीच्या घरात जाते

तीन महिन्यापूर्वी लागवड

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे सापडल्याचे वृत्त पसरताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पथकाने घटनास्थळीच पंचनामा करून ही झाडे जप्त केली. बाबरला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरूद्ध अंमलीपदार्थ अधिनियम कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारपणे तीन महिन्यापूर्वी गांजाची लागवड केली असण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेली झाडे 7 ते 13 फूट उंचीची आहेत.

कसून चौकशी

बाबरकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी त्याने गांजाची लागवड केली होती का, गांजाचा तो कुठे पुरवठा करीत होता, याचा उलघडा केला जाईल. सध्या तरी तो पहिल्यांदाच गांजाची झाडांची लागवड केल्याचे सांगत आहे, असे पथकातील अधिकारी अरूण कोळी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ताफा कारवाईत

शिपूरमध्ये छापा टाकण्याचे नियोजन गुरुवारी करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी असा 40 जणांचा ताफा मिरजेत पहाटे साडेपाच वाजता बोलावून घेण्यात आला होता. सहा वाजता छापा टाकण्यात आला. तेंव्हापासून सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शेतामध्ये विजेची सोय करून रात्रीपर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

वजन काटा आणला

गांजाच्या झाडांची मोजदाद करण्यासाठी पथकाने शेतातच वजनकाटा आणला होता. वजन करण्यासाठी सहा अधिकारी व बारा कर्मचारी दिवसभर गुंतून पडले होते. सायंकाळी सहा वाजता मोजदाद पूर्ण झाली. त्यावेळी गांजाची 400 झाडे असल्याचे निष्पन्न झाले.

दोन ट्रकमधून वाहतूक

ग्रामस्थांच्या मदतीने दोन ट्रकमध्ये गांजाची झाडे भरून ती रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगलीतील कार्यालयाजवळ आणण्यात आली. ती गोदामात ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. अटकेत असलेल्या बाबरला शनिवार दि. 27 ऑगस्ट रोजी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

महिन्यात जिल्ह्यात दुसरी कारवाई

गेल्याच महिन्यात सांगली पोलिसांनी जत तालुक्यात छापा टाकून गांजाची शेती उद्ध्वस्त केली होती. उसाच्या पिकात लावलेली लाखो रुपये किमतीची गांजाची झाडे जप्‍त केली होती. त्यानंतर शुक्रवारी शिपूरमध्ये कारवाई झाल्याने जत व मिरज पूर्व भागात
अनेक ठिकाणी अशाप्रकारे गांजाची शेती केली जात असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *