कडधान्यांच्या उत्पादनास प्राधान्य द्या
राज्यात ऊस उत्पादन वाढले आहे. परिणामी तोडणीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. भविष्यात हा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक समृद्ध करणार्या कडधान्यांची लागवड शेतकर्यांनी करावी, असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत बोलताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून लोकांशी संवाद सांधला. या कार्यक्रमाचे सांगलीत भाजप प्रदेशच्या सदस्या नीता केळकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर भंडारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, नगरसेवक शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, सम्राट महाडिक उपस्थित होते.
भंडारी म्हणाले, उसाची लागवड सध्या सुरू आहे, त्याच गतीने होत राहिली तर भविष्यात उसाच्या शेतीचा प्रश्न जटिल होणार आहे. कोणत्याही पिकाची लागवड करताना त्याचा सर्व बाबींनी विचार करणे गरजेचे आहे. कडधान्यांचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मात्र आपल्याकडील बाजरी हे सकस धान्य देखील दुर्लक्षले आहे. आपण जाणिवपूर्वक प्रयत्न केल्यास उसापेक्षा अधिक आर्थिक फायदा आपल्याला बाजरी पीक लागवडीतून मिळू शकेल. तसेच प्रमुख शहरांमध्ये कडधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांना हेल्दी फुडचा दर्जा प्राप्त झाला आहे. साहजिकच शेतकर्यांनी देखील आता आपल्या शेतामध्ये पारंपरिक ऊस शेतीऐवजी कडधान्यांची लागवड केल्यास त्यांना उसापेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकेल. प्रामुख्याने मोठे शेतकरीच ऊस शेती करतात. मात्र देशात अल्पभूधारक शेतकर्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. तसेच फुलांची शेतीस देखील प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
भंडारी पुढे म्हणाले, अद्यापही कुपोषणाची समस्या अस्तित्वात आहे. सकस आहारास सर्वांनीच प्राधान्य दिले पाहिजे. जलव्यवस्थापनाचा अविष्कार म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेला अमृत सरोवर हा उपक्रम आहे. भविष्यात पाणी समस्या निर्माण होऊ नये याकरिता हा उपक्रम जनसहभागातून राबविण्यात येत आहे. मागील काही महिन्यांचा आढावा पाहता भविष्यात जलव्यवस्थापन ही चळवळ बनत चालली असल्याचे लक्षात येते.
सांगली-इस्लामपूर रस्ता ‘नो कमेंट्स’
गेल्या कित्येक वर्षापासून सांगली-इस्लामपूर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण प्रयत्न कराल का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी ‘नो कमेंट्स’ अशी प्रतिक्रिया भंडारी यांनी दिली.