मुलगा होत नसल्याने पतीकडून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न
मुलगा होत नसल्याने मित्राच्या सहाय्याने पत्नीचा दोरीने गळा आवळून तिला काळेवाडी (ता. आटपाडी) गावाच्या हद्दीतील चिंचघाट डोंगरामध्ये फेकून देऊन खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रेमलता प्रद्युमनकुमार जेना (वय 35) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. पोलिस मदत केंद्राला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गर्भवतीला वाचविले. याप्रकरणी पतीसह त्याच्या मित्राला आटपाडी पोलिसांनी मुंबई येथून अटक केली.
पती प्रद्युमनकुमार पिताबास जेना (रा. मुंबई) व त्याचा मित्र संपतराव एकनाथ गायकवाड (रा. मान खुर्द, मुंबई, मूळगाव पात्रेवाडी, ता. आटपाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोन आरोपीना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की , प्रद्युमनकुमार याला दोन मुली आहेत.त्याची पत्नी प्रेमलता तिसर्यांदा गर्भवती होती. मुलगा होत नसल्याने प्रद्युमनकुमार याने त्याचा मित्र संपतराव गायकवाड या बरोबर घेऊन प्रेमलता यांना मुलाची तपासणी करायचे आहे, असे सांगून गाडीत बसवले. तिघेही मुंबईतून आटपाडी तालुक्यातील काळेवाडी गावाच्या हद्दीतील चिंचघाट या डोंगराळ भागात आले. त्यानंतर पती प्रद्युमनकुमार याने प्रेमलता यांचा दोरीने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रेमलता या बेशुध्द पडल्या. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजून त्यर्ळेैळ डोंगरात फेकून दिले आणि दोघेही मुंबईला निघून गेले
दरम्यान, गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेले सोमनाथ इंगळे यांना जखमी झालेल्या प्रेमलता दिसल्या. इंगळे यांनी याबाबत पोलिस मदत केंद्राला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ जखमी प्रेमलता यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रेमलता या शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पती आणि त्याच्या मित्राविरोधात फिर्याद दाखल केली.
पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी, अजित पाटील आणि राकेश पाटील, उमर फकीर, दिग्वीजय कराळे, नितीन मोरे, प्रमोद रोडे, संभाजी सोनवणे, सायबर शाखेचे कर्मचारी यांनी घटनेचा तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक माहिती घेऊन पोलिसांनी प्रद्युमनकुमार व त्याचा मित्र संपतराव या दोघांना मुंबई येथून अटक केली.