सांगली : पाकीट मिळवण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांचे बिनबुडाचे आरोप
पाकीट संस्कृतीही भाजपच्या नितीत बसत नाही. ती आमच्या काळात पूर्णपणे बंद केलेली आहे. मात्र विरोधी पक्षाचे गट नेत्यांची पाकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. यामुळे ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. या आरोपांना भिक घालणार नाही, असा पलटवार नगरपंचातीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी विरोधी पक्ष नेत्यांसह विरोधी नगरसेवकांवर केला.
कडेगाव नगरपंचायतीच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, नगरसेवक अमोल डांगे, आशपाक पठाण, हाजी मुख्तार पटेल, निलेश लंगडे, अभिजीत लोखंडे उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्ष नेत्यांचा समाचार घेताना नगराध्यक्ष देशमुख म्हणाले, कडेगाव शहरातील नागरिकांनी विरोधकांच्या पाकीट संस्कृती व खाबुगिरीला कटांळून सत्ता आमच्या ताब्यात दिली आहे. त्यांच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊन देणार नाही. जे काय बिनबुडाचे आरोप विरोधी गटाचे गटनेते करत आहेत ते पाकीट मिळवण्यासाठी चाललेली धडपड व वरिष्ठ नेत्यांना दाखवण्यासाठीचा दिखावा आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीस नगरपंचातीचे मुख्याधिकारी यांनी सर्व माहिती लेखी दिली आहे. कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देत नगरपंचायतीच पारदर्शक कारभार सुरू आहे.
पुढे ते म्हणाले, नगरपंचायतीचा स्वच्छता ठेका हा काँग्रेस काळात दिला गेलेला आहे व त्याचे मोजमाप, लांबी व टेंडर हे काँग्रेसच्या काळात झालेले आहे. शहरांमध्ये अस्वच्छता जास्त झाली होती, त्यामुळे तातडीने वर्कऑडर दिली. नगराध्यक्ष ड्रायव्हर हा सरकारच्या नियमाप्रमाणे नगराध्यक्षांना मागणीप्रमाणे देता येतो अशी तरतूद आहे. कचरा विलगीकरणाचे बांधकामदेखील आम्ही सत्तेत आल्यानंतर पूर्ण केले. नगरपंचायतीच्या कारभारात कोठेही कसूर आढळून आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी यावेळी सांगितले.