सांगली बाजार एक महिन्यासाठी बंद
गेल्या काही दिवसांपासून जनावरांमध्ये लम्पी स्कीन या साथीचा प्रादुर्भाव (Outbreak) होत असल्याचे आढळून आले आहे. जनावरांमध्ये हा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरज, सांगली, क. महांकाळ, ढालगाव, जत व माडग्याळ येथील जनावरांचे बाजार एक महिना कालावधीकरिता बंद ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मंगेश सुरवसे व सचिव महेश चव्हाण यांनी दिली.
ते म्हणाले, जिल्ह्यात व राज्यात तसेच परराज्यात गाई व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेचे निष्पन्न झाले आहे. जनावरांमध्ये होणारा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरज, कवठेमहांकाळ, जत या तिन्ही तालुक्यात भरणारे सर्व जनावरांचे बाजार भरविणेस मनाई केली आहे. तरी यानुसार शेतकरी गो पालक यांनी बाहेरच्या जिल्ह्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यामध्येही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव (Outbreak) झालेला असल्याने जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली आहे. म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारे जनावरांचे बाजार दि. 12 सप्टेंबरपासून दि. 19 ऑक्टोबरपर्यंत एक महिना कालावधीकरिता बंद ठेवण्यात आले आहेत. यावेळी सुनील चव्हाण, तानाजी पाटील उपस्थित होते.