सांगली : ‘लम्पी’ने पशुसंवर्धन विभागाला ‘धाप’
जिल्ह्यात जनावरांना होणार्या लम्पीस्कीनचा फास दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दुसर्या बाजूला पशुसंवर्धन विभागात सुमारे 231 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचार आणि लसीकरण करताना यंत्रणेला ‘धाप’ लागत आहे. दुर्दैवाने संसर्ग वाढलाच तर आहे त्या मनुष्यबळावर यंत्रणा चालवणे अवघड होणार आहे. त्यामुळे वेळीच याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. बळीराजा शेती करीत जोडधंदा म्हणून पशुधनाचा व्यवसाय करतात. यामुळे अनेकांच्या संसाराला हातभार लागतो. मात्र कोरोनामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. अशातच लम्पीस्कीनने जिल्ह्यात एन्ट्री केल्याने पशुपालकांत धास्ती आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यात 102 आणि राज्य शासनाने 51 असे एकूण 153 पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने आहेत. याच दवाखान्यामार्फत उपचार करण्यात येतात. मात्र जिल्हा पशुसंवर्धन विभागात 153 आणि थेट राज्य शासनामार्फत चालवल्या जाणार्या 51 दवाखान्यामध्ये 78 अशी 231 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचार करताना यंत्रणेला ‘धाप’ लागत आहे.
सन 2019 मधील प्राणीगणनेप्रमाणे जिल्ह्यात 14 लाख 9 हजार 279 जनावरे आहेत. गेल्या दोन वर्षात यामध्ये सुमारे 2 लाख जनावरांची संख्या वाढली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. म्हणजेच जिल्ह्यात सुमारे 16 लाख जनावरे आहेत. तर केवळ 312 अधिकारी आणि कर्मचारी आहेत. अनेक वर्षापासून पशुसंवर्धन विभागात भरती झालेली नाही. कधी होईल हे सांगता येत नाही. सुदैवाने लम्पीस्कीन बाधितपैकी एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही. मात्र प्रादुर्भाव वाढल्यास आहे त्या मनुष्यबळावर उपचार करणे शक्य होणार नाही. परिणामी भयावह स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
कंपौंडरचे झाले डॉक्टर : पशुपालकांची करतात लूट
जिल्ह्यात काही भागात शासकीय पशुवैद्यकीय दोन -तीन दवाखान्याचा भार एकाच अधिकार्यावर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टर येतात कधी आणि जातात कधी हेच लोकांना अनेकवेळा माहिती होत नाही. त्यामुळे नाईलाजाने पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागते. यातील काहीजण चांगली सेवा देतात. मात्र अनेकजण शेतकर्यांना भीती घालून दिवसाढवळ्या लुटमार करीत आहेत. काहीजण कंपौंडर म्हणून काम करणारे आज डॉक्टर म्हणून उपचार करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पशुसंवर्धनची पदे कंत्राटी पद्धतीने भरा
जिल्ह्यात मॉडेल स्कूलच्या चळवळीला शिक्षकांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या मोहिमेला गती देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातील निधी देऊन कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्यात येत आहेत. शिक्षणाप्रमाणे पशुधनही महत्वाचे आहे. त्यामुळे शिक्षकाप्रमाणे लम्पीस्कीनला दोन हात करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरती कर्मचारी भरती करावी, अशी मागणी होत आहे.
पशुसंवर्धन विभागातील पदाचा लेखाजोखा
पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी 1 1 0
पशुधन विकास अधिकारी (तालुका) 1 1 0
पशुधन विकास अधिकारी 85 42 43
सहा. पशुधन विकास अधिकारी 16 14 2
पशुधन पर्यवेक्षक 62 33 29
कक्ष अधिकारी 1 1 0
अधीक्षक 1 1 0
वरिष्ठ सहायक 2 2 0
कनिष्ठ सहायक 2 1 1
वाहन चालक 1 1 0
वर्णोचार 63 30 33
परिचर 158 113 45
एकूण 393 240 153