सांगली : जयंतरावांना धक्का; काँग्रेसचा कपाळमोक्ष

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपमधील नाराजांवर लक्ष ठेवून आणि राष्ट्रवादीच्या भरोशावर विसंबून राहिलेल्या काँग्रेसचा केवळ पराभवच नव्हे तर अक्षरश: कपाळमोक्ष झाला आहे. राष्ट्रवादीची तीनपैकी दोन मते फुटली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ‘होमपिच’वरच बसलेला हा दणका ‘वर्मी’ लागणारा ठरणार आहे. दीड वर्षापूर्वी महापौर निवडणुकीत पेरलेले आता उगवले आहे. राज्यातील सत्तांतराने स्थानिक सत्ताकारणाचे गणितही बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेची आगामी निवडणूक आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही जड जाणार असल्याचेही स्पष्ट दिसत आहे.

दीड वर्षे झाली! अगदीच दिवसच मोजले तर 567 दिवस झाले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा नामुष्कीजनक पराभव झाला होता. पालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत होते. मात्र राष्ट्रवादीने भाजपची 7 मते फोडत महापौरपद हिसकावून घेतले होते. मात्र त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. भाजपचे तब्बल 16 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. राज्यातील सत्तेचा तो महिमा ठरला होता. अन्यही काही कारणे होती. मात्र आता राज्यात सत्तांतर घडून आल्याने स्थानिक राजकारण आणि सत्ताकारणाची गणितेही बिघडून गेली आहेत. राष्ट्रवादीकडील भरती आता ओसरली आहे. आता भरती भाजपकडे सुरू झाली आहे. फुटलेले दोन सदस्य म्हणजे राष्ट्रवादीला लागलेल्या ओहोटीचे दर्शन मानले जात आहे.

स्थायी समितीत भाजपचे बहुमत आहे. विरोधी पक्षाचे सदस्य फोडून बहुमताची जुळणी करायची गरजच नव्हती. तरिही स्थायीतील राष्ट्रवादीचे तीनपैकी दोन सदस्य फोडून भाजपने राष्ट्रवादीला व पर्यायाने जयंत पाटील यांना जोरसे धक्का दिला आहे. ‘पेरलं तेच उगवलं’ ही नवनिर्वाचित सभापती धीरज सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. महापौर निवडणुकीत भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता. त्याचे उट्टे धीरज यांनी स्थायी समिती सभापती निवडणुकीत भरून काढले आहे. बहुमतासाठी गरज नसतानाही राष्ट्रवादीचे सदस्य फोडून भाजपने जयंत पाटील यांची कळ काढली आहे. पक्षातील सदस्य फुटून जाण्याचे दु:ख किती तीव्र असते. त्याची बोचणी किती जबर असते हे भाजपने दाखवून दिले आहे. नव्हे तर राष्ट्रवादीच्या दुखर्‍या नसेवर जणू बोट ठेवले आहे.

स्थायी समितीत भाजपचे नऊ, काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचे तीन असे संख्याबळ आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीचे संख्याबळ सात आहे, पण शेवटच्या वर्षासाठीचे सभापतीपद मिळवण्यासाठी भाजपमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू होती. स्थायी समितीत भाजपने धीरज सूर्यवंशी यांची सदस्य म्हणून एंट्री घडवून आणली, त्याचवेळी त्यांचे सभापतीपद निश्चित झाले होते. त्यामुळे सभापतीपदाचे प्रबळ इच्छुक गजानन आलदर नाराज झाले होते. पक्षाच्या परोक्ष उमेदवारी अर्ज घेऊन व मोबाईल स्विचऑफ करून त्यांनी सवतासुभा घेतला होता. भाजपमध्ये खळबळ उडवून दिली होती. पण धीरज सूर्यवंशी समर्थकांनी मध्यरात्री तीन वाजता त्यांना ताब्यात घेतले. भाजपने सर्व 9 सदस्यांना बंदोबस्तात महाबळेश्वरला सक्तीच्या सहलीवर पाठवून सुस्कारा सोडला. भाजपमधील नाराजांवर भिस्त ठेवून सभापतीपदाचे गाजर खाण्याचे काम काँग्रेसमध्ये सुरू होते.  युद्धपातळीवर हालचाल करण्यात काँग्रेसला अपयश आले.

भाजपमधील नाराजीचा लाभ उठवण्यात काँग्रेस यशस्वी होऊ शकला नाही. उलट काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची 7 मतेही मिळवता आली नाहीत. राष्ट्रवादीची दोन मते फुटल्याने काँग्रेसचा केवळ पराभवच झाला नाही, तर जणू कपाळमोक्ष झाला आहे. राष्ट्रवादीने धोका दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पण निवडणुकीच्या राजकारणात जेवढी दक्षता आवश्यक असते, तेवढी काँग्रेसकडून घेतली जात नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी होणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. पण भाजपच्या ताकदीपुढे टिकाव लागायचा असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीला एकदिलाने एकत्र रहावे लागणार आहे. ते त्यांना क्रमप्राप्त आहेे.

ज्या गावच्या बाभळी…

जुलै – ऑगस्ट 2023 मध्ये पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्याला आता उणेपुरे दहा महिने उरले आहेत. येणार्‍या कालावधीत बरीच राजकीय स्थित्यंतरे घडतील. भाजपने आगामी निवडणुकीत ‘50 प्लस’चे टार्गेट निश्चित केले आहे. त्यादिशेने भाजपची पावले पडत आहेत. सन 2018 च्या पालिका निवडणुकीत भाजपने सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत बरीच तोडफोड केली होती. राज्यात त्यावेळी भाजपची सत्ता होती. भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीमधील आयारामांना घेऊन महापालिकेत एकहाती झेंडा फडकावला होता.

भाजपच्या नगरसेवकांमध्ये पूर्वाश्रमीचे काँग्रेस, राष्ट्रवादीचेच अनेकजण आहेत. ही सारी मोट बांधून भाजपने महापालिकेत सत्ता आणली होती. पण राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील यांनी डावास डाव केला. त्यांनी भाजपमध्ये तोडफोड करून महापौरपद खेचून आणले होते. सन 2018 च्या निवडणुकीत तोडफोड करून पेरलेले बीज, दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या महापौर निवडणुकीत अंकुरले होते. आता भाजपनेही तोच कित्ता गिरवत स्थायी सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीला अस्मान दाखवले आहे. जणू ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी हे दाखवून दिले आहे. पेरणे आणि उगवणे सुरूच आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *