सांगली मनपा स्थायी सभापतिपदी धीरज सूर्यवंशी
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता हारगे व पवित्रा केरीपाळे गैरहजर राहिल्याने भाजपचे धीरज सूर्यवंशी यांचा विजय सोपा झाला. भाजपच्या सूर्यवंशी यांना नऊ, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संतोष पाटील यांना पाच मते पडली. राष्ट्रवादीच्या दोन सदस्या भाजपच्या गोटात गेल्याने प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी मनपाच्या सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापतिपदासाठी मंगळवारी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, तर काँग्रेसकडून संतोष पाटील व फिरोज पठाण यांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम आलेल्या अर्जांची छाननी केली. यामध्ये तिघांचे अर्ज वैध झाले. त्यानंतर अर्ज माघारीच्या वेळेत काँग्रेसचे फिरोज पठाण यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे धीरज सूर्यवंशी व काँग्रेसचे संतोष पाटील यांच्यात लढत झाली. समितीत भाजपचे नऊ, काँग्रेसचे चार, तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत.
भाजपच्या सर्व म्हणजे नऊ सदस्यांनी धीरज सूर्यवंशी यांना मतदान केले, तर संतोष पाटील यांना काँग्रेसच्या चार व राष्ट्रवादीच्या एका सदस्याने मतदान केले. त्यामुळे सूर्यवंशी यांना नऊ, तर पाटील यांना पाच मते पडली. राष्ट्रवादीच्या संगीता हारगे व पवित्रा केरीपाळे या दोन सदस्यांनी सभेला गैरहजेरी लावली होती. त्यामुळे भाजपचे धीरज सूर्यवंशी यांचा विजय सोपा झाला झाला. राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्या दोन दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती होती, तरीही त्यांना परत आणण्यात राष्ट्रवादीला अपयश आले.