मदनभाऊ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा शनिवारपासून सुरू
महापालिकेतर्फे (स्व.) मदनभाऊ पाटील स्मृती मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (One act competition) शनिवारपासून सुरू होत आहे. राज्यातील 128 नाट्यसंस्थांमधून 25 संस्थांच्या एकांकिकांची स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, स्पर्धा सुकाणू समितीचे कार्याध्यक्ष संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी 6 वाजता होणाार आहे. स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. पारितोषिक वितरण सोहळा सामेवारी रात्री साडेसात वाजता होणार आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील उद्घाटक आहेत. महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगीळ, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, शेखर इनामदार, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, आयुक्त सुनील पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
लाखमोलाचे बक्षीस
मदनभाऊ महाकरंंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे (One act competition) हे चौथे वर्ष आहे. प्रथम क्रमांकास रोख रुपये 1 लाखाचे बक्षीस व मानाचा मदनभाऊ महाकरंडक व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकास रोख 50 हजार रुपये, मदनभाऊ करंडक व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख 25 हजार रुपये मदनभाऊ करंडक व प्रशस्तीपत्र असे बक्षीस आहे.
कोल्हापूर, मुंबई, डोंबिवली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी, सांगली, मिरज आदी शहरांतून नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत. या स्पर्धा बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत होणार आहेत. नाट्यसंस्थांसाठी राहण्याची व जेवणाची सोय महापालिकेने केली आहे. एकवेळचा प्रवास खर्च दिला आहे.
विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, सुकाणू समिती सदस्य आणि नगरसेविका भारती दिगडे यांच्यासह सुकाणू समितीचे सदस्य मुकुंद पटवर्धन, चंद्रकांत धामणीकर, अंजली भिडे, विशाल कुलकर्णी, मनपा ग्रंथालय विभागाचे राहुल मुळीक उपस्थित होते.
ज्येष्ठ रंगकर्मींचा होणार गौरव
गेली 2 वर्षे कोरोनामुळे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यावर्षी स्पर्धक संघामधे व रसिकांमध्ये या स्पर्धेविषयी उत्सुकता आहे. या एकांकिका स्पर्धा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील कला रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. यावर्षीपासून आपल्या महानगरपालिका क्षेत्रातील सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ रंगकर्मींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालय, विद्यार्थी तसेच नाट्य रसिकांनी या एकांकिका स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.